फाटक प्रशालेत संशोधनवृत्ती वाढीसाठी टिंकरिंग लॅब

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

रत्नागिरी - मुलांना विज्ञानाची गोडी लागून जिज्ञासा वाढावी व त्यांनी उपकरण तयार करून संशोधनास प्रवृत्त व्हावे, या हेतूने अटल टिंकरिंग लॅब फाटक हायस्कूलमध्ये उभारण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या नीती आयोगातर्फे उभारण्यात आलेली जिल्ह्यातील ही एकमेव लॅब आहे.

रत्नागिरी - मुलांना विज्ञानाची गोडी लागून जिज्ञासा वाढावी व त्यांनी उपकरण तयार करून संशोधनास प्रवृत्त व्हावे, या हेतूने अटल टिंकरिंग लॅब फाटक हायस्कूलमध्ये उभारण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या नीती आयोगातर्फे उभारण्यात आलेली जिल्ह्यातील ही एकमेव लॅब आहे. ८ लाखांची विविध उपकरणे येथे आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही शाळेच्या जिज्ञासू विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येणार आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवशी येत्या २५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता लॅबचे उद्‌घाटन फिनोलेक्‍स ॲकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद करणार आहेत, अशी माहिती दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष सुमिता भावे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मुख्याध्यापिका शुभांगी वायकूळ, समन्वयक राजीव गोगटे उपस्थित होते.
भारतातील १३५०० शाळांच्या सादरीकरणातून ५०० शाळांची निवड लॅबसाठी झाली. त्यात फाटक हायस्कूलचा क्रमांक लागला. या लॅबसाठी पाच वर्षांत २० लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. फाटक हायस्कूलला १२ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यानंतर देखभालीसाठी २ लाख रुपये प्रतीवर्षी मिळणार आहेत. वर्षभरात २५ कार्यशाळाही आयोजित करून विद्यार्थी, शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार आहे.

जानेवारी ते मार्चदरम्यान विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्याला दोन दिवस शाळेच्या वेळ सोडून कार्यशाळांचे नियोजन केले आहे. निवडक विद्यार्थ्यांसाठीचे प्रशिक्षण २३ व २४ डिसेंबरला आहे. यात तयार केलेल्या काही साधनांचे प्रदर्शन २५ डिसेंबरला भरवण्यात येईल. फाटक हायस्कूलमध्ये १९६५ च्या दरम्यान केमिकल टेक्‍नॉलॉजी हा विषय शिकवला जात होता. महाराष्ट्रात अशा दोनच शाळा होत्या. सातत्याने नवनवीन प्रयोग व उपक्रम शाळेत राबवले जातात. अटल लॅब हा या वाटचालीतील मैलाचा दगड आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, प्रोटोटाईप क्षेत्रामधील सेवाभावी मंडळींची या लॅबबाबत मार्गदर्शन करण्यासाठी स्थानिक समिती केली आहे.

सुरक्षित प्रयोगांसाठी दक्षता
१९०० चौरस फुटांच्या लॅबमध्ये सहावी ते बारावीमधील कोणताही विद्यार्थी प्रयोग करू शकतो. तसेच जिल्ह्यातील जिज्ञासू विद्यार्थ्यांनाही पूर्वपरवानगीने संधी मिळू शकेल. इलेक्‍ट्रॉनिक पार्टस्‌, मेकॅनिकल, इलेक्‍ट्रिकल, थ्री-डी प्रिंटर, ड्रोन, व्डिडिओ कॉन्फरन्सिंग, रोबोटिक्‍स किट्‌स, ८ प्रकारचे सेन्सर्स, सेफ्टी गॉगल्स यांसह अनेक प्रकारचे साहित्य असून त्यातून प्रयोग करता येतील. सुरक्षित प्रयोग कसे करावेत, याची दक्षता घेतली जाणार आहे. 

लॅब विद्या उपयुक्त
गतवर्षी अटल टिंकरिंग लॅबसंदर्भात माहिती मिळाल्यावर फाटक हायस्कूलच्या केतन गोगटे, तीर्था कीर, वरेण्य जोशी यांनी प्रोजेक्‍ट सादर केला. त्याचे सादरीकरण गतवर्षी नोव्हेंबरमध्ये पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात केले. ही लॅब साऱ्यांना उपयुक्त असल्याने दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परुळेकर यांनी पाठबळ दिले. यामुळे सहा महिन्यांतच लॅब उभारणी केली.

Web Title: Ratnagiri news Tikaring lab in Phatak school