लातूरच्या पर्यटकांची गाडी समुद्राच्या वाळूत रुतली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - तालुक्‍यातील नेवरे-काजिरभाटी समुद्रकिनारी लातूर येथील पर्यटकांना आततायीपणा चांगलाच नडला. त्यांनी मोटार समुद्रकिनारी नेल्याने ती वाळूत रुतल्याने त्यांना घामच फुटला. दुपारी समुद्राला भरती असल्याने पाणी वाढल्यामुळे या पर्यटकांची घाबरगुंडी उडाली. अखेर स्थानिकांनी पुढाकार घेऊन जेसीबीच्या साह्याने रुतलेली गाडी बाहेर काढली. 

दिवाळीच्या सुटीमुळे जिल्ह्यात पर्यटनस्थळी गर्दी आहे. यामध्ये समुद्रकिनाऱ्यांचे मोठे आकर्षण पर्यटकांना आहे. अशाच लातूरमधून आलेल्या पर्यटकांना त्यांचा अतिउत्साह नडला. सुदैवाने स्थानिकांनी मदत केली म्हणून अन्यथा अनर्थ झाला असता. 

लातूर येथील काही पर्यटक मोटार घेऊन गणपतीपुळे येथे देवदर्शनाला आले होते. देवदर्शन केल्यानंतर त्यांनी नेवरे-काजिरभाटी येथील समुद्र किनाऱ्यावर मौजमजा करण्याचा निर्णय घेतला. समुद्रकिनारा पाहून त्यांनी मोटार किनाऱ्यावरच नेली. स्थानिकांनी त्यांना आगाऊ सूचना दिली होती. भरती सुरू आहे, गाडी किनाऱ्यावर नेऊ नका, गाडी वाळूत रुतेल; परंतु हौशी पर्यटकांनी उत्साहाच्या भरात त्याकडे कानाडोळा केला.

गाडीची चाके वाळूत रुतत गेल्याने त्यांची बोबडी वळली. आता आपण यातून बाहेर निघणार नाही, अशी त्यांची खात्री झाली होती. स्थानिक नागरिक हे सर्व बघत होते. अतिउत्साहाचा पश्‍चाताप झाल्यानंतर त्यांनी स्थानिकांकडे मदत मागितली. गाडी अन्य वाहनाने ओढून निघण्याची शक्‍यता कमी होती. अखेर जेसीबी बोलावण्यात आला. जेसीबीने वाट करून रुतलेली गाडी ओढून बाहेर काढण्यात आली. 

Web Title: ratnagiri news tourist vehicle problem