रत्नागिरी ते गणपतीपुळे सागरीमार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

रत्नागिरी - रत्नागिरी ते गणपतीपुळे सागरी महामार्गावरील शिरगाव येथील अरूंद रस्त्यामुळे होणार्‍या वाहतुक कोंडीचा ताप आजही पर्यटकांसाठी गरैसोयीचा ठरत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी पर्याय काढला असला तरीही दोन कोटी रुपयांना मंजूरी मिळेपर्यंत हा प्रश्‍न सुटणार नाही.

रत्नागिरी - रत्नागिरी ते गणपतीपुळे सागरी महामार्गावरील शिरगाव येथील अरूंद रस्त्यामुळे होणार्‍या वाहतुक कोंडीचा ताप आजही पर्यटकांसाठी गरैसोयीचा ठरत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी पर्याय काढला असला तरीही दोन कोटी रुपयांना मंजूरी मिळेपर्यंत हा प्रश्‍न सुटणार नाही. सध्या उन्हाळी सुट्टीमुळे गणपतीपुळेकडे जाणार्‍या मार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शिरगावमध्ये सातत्याने कोंडी होत आहे.

आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ गणपतीपुळे आणि या सागरी मार्गावर असलेल्या पर्यटन स्थळामुळे शिरगाव रस्त्याला पर्यटकांच्यादृष्टीने महत्व आहे. शिवरेवाडी ते शिरगाव उर्दु शाळेपर्यंत रस्ता पाच ते सहा मीटर इतकाच आहे. त्यामुळे एकावेळी दोन वाहने पास होणे अशक्य होते. रुंदीकरणासाठी प्रांताधिकारी अमित शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी केली. बांधकाम विभागाकडून दोन कोटीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. निधी नसल्याने अजून वर्षभर या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

मे महिन्याची सुट्टी लागल्यानंतर पर्यटकांचा राबता वाढला आहे. गणपतीपुळेमध्ये प्रतिदिन तीस हजाराहून अधिक पर्यटक दाखल होत आहेत. बहुतांशी पर्यटक रत्नागिरी शहराला भेट देऊन पुढे जातात. त्यामुळे शिरगावमधूनच त्यांना पुढे जावे लागते. अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यात काही वाहनचालकांचा अतिउत्साहही कारणीभूत ठरतो. जिल्हाप्रशासनाकडून या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूकही केली आहे. पोलिस उपस्थित नसले तर मात्र पर्यटकांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो.

शिरगावचा हा रस्ता 5 मीटर रूंदीचा आहे. दोन्ही बाजुला एक ते दिड मीटर म्हणजे दोन किंवा तीन मीटरने रस्ता  वाढविण्याचा विचार यावेळी मांडण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामस्थांशी पंधरा दिवसवात बैठक घेण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Web Title: Ratnagiri News traffic jam on Ganapati Pule Road