खेड तालुक्यात संरक्षित 100 हेक्टर वनक्षेत्रात राजरोस तोड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

खेड - तालुक्यातील रसाळगड या ऐतिहासिक किल्ल्याच्या पायथ्याशी सुमारे 100 हेक्टरपेक्षा अधिक संरक्षित वनक्षेत्र आहे. याच परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून बेसुमार जंगलतोड होत आहे. वनरक्षक श्री. धोंडगे यांच्याकडे संपर्क साधला असता संरक्षित वनक्षेत्रानजीकच्या खासगी जागेत ही तोड परवानगीने होते, असे त्यांनी सांगितले. परवानगीपेक्षा अधिक व संरक्षित वनातही तोड केल्याचा आरोप परिसरातील निसर्गप्रेमींनी केला आहे.

खेड - तालुक्यातील रसाळगड या ऐतिहासिक किल्ल्याच्या पायथ्याशी सुमारे 100 हेक्टरपेक्षा अधिक संरक्षित वनक्षेत्र आहे. याच परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून बेसुमार जंगलतोड होत आहे. वनरक्षक श्री. धोंडगे यांच्याकडे संपर्क साधला असता संरक्षित वनक्षेत्रानजीकच्या खासगी जागेत ही तोड परवानगीने होते, असे त्यांनी सांगितले. परवानगीपेक्षा अधिक व संरक्षित वनातही तोड केल्याचा आरोप परिसरातील निसर्गप्रेमींनी केला आहे.

कोकणातील सह्याद्रीच्या रांगांमध्ये गेल्या काही वर्षांपासून बेलगाम जंगल तोड होत असून त्याकडे स्थानिक वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सातत्याने पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. खेड तालुक्यात शिवकालीन रसाळगडच्या पायथ्याशी शंभर हेक्टरपेक्षा अधिक संरक्षित वनक्षेत्र आहे. तालुका वन विभागामार्फत या क्षेत्रात वनरक्षणासाठी वनरक्षक कर्मचारी देखील नेमण्यात आला आहे. परंतु सह्याद्रीच्या परिसरातील डोंगरावरील वनांची कत्तल लाकूडमाफिया करीत आहेत.

रसाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या संरक्षित वनक्षेत्रात होत असलेल्या वृक्षतोडीकडे वन विभागाने काणाडोळा केलेला दिसून येतो. पर्यावरणाचा समतोल सातत्याने बिघडत असल्याने एका बाजूला राज्य व केंद्र सरकार वृक्ष लागवडीसाठी विविध योजना राबवत आहे. परंतु, दुसर्‍या बाजूला त्याच सरकारमधील एक जबाबदार यंत्रणा तोडीकडे दुर्लक्ष करीत आहे. जळाऊ अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या खासगी जागेतील झाडे तोडायची झाल्यास त्याच्या कित्येक पटीने झाडांची लागवड करण्याची अट शासनाने घातलेली आहे.

खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगामध्ये बांद्रीपट्टा, सातगाव परिसर, धामणंद पंधरागाव परिसर, खाडीपट्टा आदी सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलांची तोड बिनदिक्कतपणे सुरू असून, त्या तुलनेने कोठेही मोठ्या प्रमाणात खासगी तोड करणार्‍यांनी झाडे लावल्याचे दिसून येत नाही. रसाळगडच्या पायथ्याशी घनदाट वनक्षेत्रात गेल्या तीन महिन्यांपासून जनरेटरवर चालणार्‍या लाकूड तोडण्याच्या करवतींनी या ठिकाणी लाकूडतोड सुरू आहे. तीन महिने दररोज झाडांची कत्तल करून ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनांतून दिवसा उजेडी त्याची वाहतूक होत असताना स्थानिक वन कर्मचारी व अधिकार्‍यांना  समजत नाही, यावर विश्‍वास बसणे शक्य नाही.

वनाधिकारी मोहितेंना पाहणीस वेळ नाही

तालुक्यातील रसाळगडच्या पायथ्याशी सुरू असलेल्या संरक्षित वनक्षेत्र परिसरात सुरू असलेल्या लाकूड तोडीबाबत माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, खासगी जागेवर झाडे तोडण्याची आम्ही परवानगी दिली आहे. या भागात बेसुमार जंगलतोड झाली असली, तरी त्या भागाची पाहणी करण्यास आता माझ्याकडे वेळ नाही. 

तक्रारदारांना धुडकावण्यात येते

जंगलतोड गेले तीन महिने सुरू आहे. निवडक झाडांची तोड करण्याचा परवाना वन विभागाने दिला आहे. परंतु रसाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या संरक्षित वनक्षेत्राच्या लगतचे सुमारे तीस एकर परिसरातील संपूर्ण जंगल तोडण्याचा चंग बांधलेला दिसतो. या प्रकरणी मी अनेक वेळा वन विभागाकडे संपर्क केला. हा राजकीय पुढारी असून, येथील वन विभागाकडून आम्हा तक्रारदारांना वेळोवेळी धुडकावण्यात येते, अशी माहिती तेथील स्थानिक ग्रामस्थ सचिन शिंदे यांनी दिली.

Web Title: Ratnagiri News tree cutting in 100 hector forest