टीसीएस कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांच्या डोळ्यात अंजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

दाभोळ - टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या पुणे येथील कार्यालयातील सुमारे ३२ कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करून गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली.

दाभोळ - टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या पुणे येथील कार्यालयातील सुमारे ३२ कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करून गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली. समुद्रकिनारी पर्यटनाला येऊन तेथे कचरा टाकणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यात अंजन घातले.
आंजर्ले येथील प्रसिद्ध कासव महोत्सव पाहण्यासाठी पुणे येथील टीसीएसच्या सहा कार्यालयातील ३२ कर्मचारी शनिवारी (ता. २१) आंजर्ले येथे दाखल झाले.

आंजर्ले समुद्रकिनारी असलेल्या कासवाच्या घरट्यांमधून संध्याकाळी कासवाची पिले समुद्रात सोडण्यात येणार होती. मात्र घरट्यातून कासवांची पिले बाहेर न आल्याने हा सोहळा पाहण्यासाठी आलेले हे कर्मचारी निराश झाले नाहीत. त्यांनी आपल्याला मोकळा वेळ आहे, तो आपण येथील समुदकिनाऱ्याची स्वच्छता करूया, असे ठरविले व टीसीएसच्या ग्रुपमधील ३२ जणांनी किनाऱ्यावरील सुमारे ४०० मीटर भागातील कचरा गोळा केला. तो गोण्यांमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावली. मात्र दोन दिवस हवामानातील बदलामुळे अंड्यातून कासवाची पिले बाहेर न आल्याने या ग्रुपला कासवांची पिले समुद्राच्या दिशेने धाव घेताना पाहता आली नाही व त्यांना पुणे येथे परतावे लागले. 

टीसीएससारख्या मोठ्या कंपन्यांनी तसेच इतर कंपन्यांनीही रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील सुरू असलेल्या कासव संरक्षण मोहिमेला त्यांच्या सीएसआर निधीतून मदत केल्यास या चळवळीला अधिक गती येईल.
- मोहन उपाध्ये,
सदस्य, कासव संरक्षण मोहीम

यासंदर्भात टीएसएसचे कर्मचारी स्वप्नील वांजुळे म्हणाले की, ‘‘आमचा टीसीएस मैत्री पुणे इकॉलॉजी ग्रुप आहे. या ग्रुपच्या वतीने आम्ही नेचर रिलेटेड ॲक्‍टिव्हिटी राबवितो. तसेच आम्ही निसर्ग सहलींचेही आयोजन करतो. या ॲक्‍टिव्हिटीजचा एक भाग म्हणून आमच्या ग्रुपने आंजर्ले येथे कासव महोत्सवाला जायचे ठरविले. येथे येण्यापूर्वीच आम्ही आंजर्ले येथील समद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्याचे ठरविले होते. आम्हाला हवामानातील बदलामुळे कासवाची पिले अंड्यातून बाहेर न आल्याने ती पाहावयास मिळाली नाहीत, मात्र आम्ही ३२ जणांनी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली यात आम्ही तेथे आलेल्या इतर पर्यटकांनाही आमच्या बरोबर स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनीही आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तेही या अभियानात सहभागी झाले होते.’’

Web Title: Ratnagiri News TSC workers clean Anjerli sea shore