मुंबईचा एमडीआर ‘क्षय’ रत्नागिरीत पसरतोय!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

नियमित आजाराच्या जंतूंचे स्वरूप बदलले असून त्यापेक्षा अधिक क्षमतेचा जीवाणू मुंबईत आढळून येत आहे. अशा एमडीआर क्षयरोगाचे रुग्ण जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहेत. त्याला कोकणचे मुंबई कनेक्‍शन जबाबदार असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट केले. 

रत्नागिरी -  क्षयरोगाचे रुग्ण सर्वाधिक मुंबईमध्ये आढळतात. त्यापाठोपाठ राज्यात रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्ण आढळून येत आहेत. नियमित आजाराच्या जंतूंचे स्वरूप बदलले असून त्यापेक्षा अधिक क्षमतेचा जीवाणू मुंबईत आढळून येत आहे. अशा एमडीआर क्षयरोगाचे रुग्ण जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहेत. त्याला कोकणचे मुंबई कनेक्‍शन जबाबदार असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट केले. 

जिल्ह्यात नऊ महिन्यांत दीड हजार रुग्ण आढळले असून त्यात थुंकीद्वारे बाधित एक हजार रुग्ण आहेत. सुदैवाने उपचार सुविधांमुळे मृत्यूचे प्रमाण घटत आहे.

वेळेत तपासणी आणि उपचार यामुळे क्षयरोग बरा होतो; पण 
कोकणातील लोकं अजूनही अंगारे धुपाऱ्यांच्या मागे जाऊन या रोगाचा प्रादुर्भाव वाढवत आहेत. जिल्ह्यात २०१२ ते नोव्हेंबर २०१७ पर्यंत १२ हजार ७५२ जण क्षयरोगी बनले आहेत. पाच वर्षांत २७५ जणांचा बळी घेतला. हा संसर्गजन्य आजार आहे. सलग वर्षभर औषधे घेतल्यानंतर आटोक्‍यात येतो. देशातील ४० टक्के लोकांना क्षयाने बाधित असून दररोज पाच हजार नागरिकांना याची लागण होते. १२२ जणांना एमडीआर टीबी झाल्याचे निदान झाले. १२२ एमडीआर रुग्णांपैकी १३ रुग्ण ऑक्‍टोबर महिन्यात सापडले. २०२५ पर्यंत क्षयमुक्‍त भारत ही संकल्पना हाती घेण्यात आली आहे.

क्षयरोगाचा टाईमबॉम्ब म्हणून एमडीआर (मल्टी ड्रग्ज रेजिस्टन्स) क्षयाची ओळख आहे. याला मराठीत बहुविध औषधाला दाद न देणारा असे म्हटले जाते. मुंबईमध्ये याचे सर्वाधिक रुग्ण सापडतात. कोकणातील अनेक लोक मुंबईत वास्तव्याला आणि तिथे जोडली गेल्यामुळे त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी प्रशासनही सज्ज आहे; परंतु अनेक बाधित रुग्ण त्वरित उपचार करून घेत नाहीत. शेवटच्या पायरीवर दाखल होतात. त्यामुळे जीविताचा धोका अधिक वाढतो. रत्नागिरीमध्ये एमडीआर किंवा नियमित क्षयाची तपासणी करण्यासाठी सीबनेट ही यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. वर्षभरापूर्वी त्यासाठी मुंबईत जावे लागते. ही तपासणी केल्यानंतर त्वरित उपचार सुरू केले जातात. त्यातून रुग्णाची तब्येत सुधारण्यास मदत होत आहे.

दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला, ताप येणे, गतीने वजन घटणे ही लक्षणे आहेत. छातीसह मेंदू, हाडे, गळा या अवयवांना क्षयाचा प्रादुर्भाव होतो. खोकला आणि शिंकेतून याचा संसर्ग होतो. प्रतिकारशक्ती कमी होते. दमट वातावरणात हा रोग अधिक बळावतो. सध्याचे वातावरण त्याला पोषक आहे.

जिल्ह्यातील दमट हवा आणि कोस्टल एरिया हा क्षयासाठी पोषक मानला जातो. एमडीआर क्षयासाठी दोन वर्षांची उपचार पद्धती आहे. शासनाच्या शोधमोहिमेमुळे रुग्णांची नोंद होत आहे. २०२५ पर्यंत संपूर्ण देश क्षयमुक्‍त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- डी. बी. सुतार,
जिल्हा क्षयरोग अधिकारी

  • वर्ष        रुग्णसंख्या        मृत्यूदर
  • २०१२      २४६२         ६.९४
  • २०१३      २४१३         ५.७२
  • २०१४      २२४२         ५.१३
  • २०१५       २२३३         ४.६६
  • २०१६       १८६०        ४.६४
Web Title: Ratnagiri News tuberculosis spread in district