गुहागरात हळद पावडरचा ब्रॅण्ड विकसित करणार

गुहागरात हळद पावडरचा ब्रॅण्ड विकसित करणार

गुहागर - तालुक्‍यात हळदीचे विक्रमी उत्पादन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. याची सुरवात म्हणून झिरो बजेट नैसर्गिक शेती पद्धतीने दोन एकर क्षेत्रात हळद लागवड करण्यात येणार आहे. तालुक्‍यात कोकण स्पेशल ४ विषमुक्त हळद व हळद पावडरचा ब्रॅण्ड विकसित व्हावा असा संकल्प या शेतकऱ्यांनी सोडला आहे. मुंढर येथील मामाचं गाव कृषी पर्यटन केंद्र येथे शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सचिन कारेकर यांनी सांगितले. 

दापोलीत सुभाष पाळेकर गुरुजींच्या पाच दिवसांच्या शिबिरात गजेंद्र पौनीकर, नित्यानंद झगडे, बी. बी. पाटील, नितीन रहाटे, अविनाश माने, अनंत जोयशी, संदीप वजरेकर या शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. तर सचिन कारेकर यांनी मुरबाड, जि. ठाणे येथे पाच दिवसांच्या कृषी शिबिरात सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणानंतर गुहागर तालुक्‍यात झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा प्रसार व्हावा यासाठी काम करण्याचे या शेतकऱ्यांनी ठरविले. 
आबलोलीतील सचिन कारेकर यांनी कोकण स्पेशल -४ हे हळदीचे वाण विकसित केले. या वर्षी वाणाची २७ हजार रोपे गुहागरसह अन्य तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी खरेदी केली. त्यामुळे तालुक्‍यात झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा प्रसार हळद उत्पादनापासून सुरू करावा असा निर्णय मुंढर येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी घेतला. एप्रिलमध्ये २० हजार रोपे प्रो ट्रेमध्ये तयार करण्याच्या कामाला सुरवात होणार आहे. 

 हळद लागवडीसाठी शेणखत, गांडूळखत ही सेंद्रिय खते, जीवामृत यासोबत रासायनिक खते, कीटकनाशके व बुरशीनाशके वापरण्यात येत होती, मात्र दापोलीतील शिबिरानंतर नैसर्गिक पद्धतीने विक्रमी उत्पादन आपण घेऊ शकतो, असा विश्वास आमच्यात निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रयोग म्हणून सुरवातीला २ एकरांवर आम्ही हळद लागवड यशस्वी करणार आहोत. 
- गजेंद्र पौनीकर,
शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com