‘तुतारी’, पण कोकणी आवाज कानावर जाईना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - आंदोलनानंतर कोकणी माणसासाठी दादर-सावंतवाडी राज्यराणी सुरू झाली. तिचे तुतारी एक्‍स्प्रेस असे बारसेही झाले; मात्र सदोदित भरलेल्या या गाडीला अधिक डबे हवेत ही मागणी काही पूर्ण होत नाही. अधिक डबे जोडून २२ डब्यांची गाडी सोडायची, तर ती दादरऐवजी सीएसटीवरून सोडावी लागेल; पण हा बदल काही होत नाही. कोकणी माणसाचा आवाज कोकण रेल्वेच्या कानात जात नाही.

या गाडीची तिकिटे मिळणे मुश्‍कील होते. सणावाराला आणि सुटीच्या दिवसात तर पाड लागत नाही. दीर्घ वेटिंग लिस्टमुळे अनेक वेळा कोकणी माणसाचा हिरमोड होतो. ही गाडी २२ ऐवजी १५ डब्यांचीच आहे. ती अपुरी पडते. गाडीला २२ डबे द्या, अशी मागणी होत आहे; परंतु २२ डबे का जोडले जात नाहीत, यातील गोम वेगळीच आहे. या रेल्वेला दादर येथे दिलेला फ्लॅटफॉर्म पुरेसा लांब नाही. तेथील १५ पेक्षा अधिक डब्यांच्या गाड्या सोडता येत नाही, असे उत्तर रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले व कोकणी माणसाच्या जखमेवर मोठ चोळले. कोकणी माणसाच्या गाडीला मुंबईत फ्लॅटफॉर्मसाठी आवश्‍यक जागा मिळू नये, ही चीड आणणारी बाब आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनसवर (सीएसटी) १७ ते १८ फ्लॅटफॉर्म आहेत. त्यापैकी पुरेशा लांब फ्लॅटफॉर्मवरून ही गाडी सोडता येईल. यापूर्वी नागपूरला जाणारी सेवाग्राम एक्‍स्प्रेस दादरहून सोडली जात होती; पण डबे कमी असल्याने प्रवाशांच्या मागणीनुसार ती आता दादरऐवजी छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटते. याचे कारण तेथील जागरूक लोकप्रतिनिधींनी दबाव आणला. कोकणात त्याचीच वानवा आहे. तत्कालीन रेल्वेमंत्र्यांना तुतारी एक्‍स्प्रेस सीएसटीवरून सोडता आली नाही. त्याचे नाव भले केशवसुतांच्या तुतारीचे दिले, तरी कोकणी माणसाचा आवाज काही कानी पडत नाही.

कोकणात रेल्वे आणली ते स्वर्गीय मधू दंडवते आज असते, तर कोकणी माणसाचा प्रवास सुखकर होण्यासाठी आम्हाला काहीच मागावे लागले नसते. स्थानक बदलून रेल्वे सोडा, ही साधी मागणी आज पुरी होत नाही, हे दुर्दैव.
- एन. रावराणे, प्रवासी

Web Title: ratnagiri news tutari train wagon issue