उपनिरीक्षकाचे रिव्हॉल्व्हर चोरणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

रत्नागिरी - सैन्य भरतीच्या बंदोबस्ताला असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाच्या सॅकमधून सर्व्हिस रिव्हॉल्व्हर चोरल्याप्रकरणी दोघांना शहर पोलिसांनी सातारा येथून अटक केली.

रत्नागिरी - सैन्य भरतीच्या बंदोबस्ताला असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाच्या सॅकमधून सर्व्हिस रिव्हॉल्व्हर चोरल्याप्रकरणी दोघांना शहर पोलिसांनी सातारा येथून अटक केली. चोरीच्या या रिव्हॉल्व्हरमधील दहाच्या दहा राऊंड संशयितांनी शेतात जाऊन फायर केले होते. त्यानंतर पिस्तूल विकण्याचे ठरवले. याची टीप सातारा आणि रत्नागिरी शहर पोलिसांना मिळाली. त्यावरून सापळा रचून ही कारवाई सातारा पोलिसांनी केली. संशयितांकडून ६० हजार किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि रिकामी पुंगळी जप्त केली. 

श्रीधर ज्ञानदेव कुंभार (वय २२, रा. गडकरआळी, धुमाळआळी, शाहूपुरी-सातारा) आणि  स्वयंभू मेघराज शिंदे (वय २१, रा. परखंदी ता. वाई, जि. सातारा) अशी रिव्हॉल्व्हर चोरणाऱ्या संशयितांची नावे आहेत. ही घटना १४ फेब्रुवारी २०१५ ला रात्री बारा ते दुपारी बारा या दरम्यान सैन्य भरती मार्शल पॉईंट शिवाजी स्टेडियम रत्नागिरी येथे घडली होती.

पोलिस उपनिरीक्षक भीमराव ज्ञानदेव पाटील (वय ३५, पोलिस उपनिरीक्षक सध्या रा. शेवरवाडी, लांजा. मूळ - शिंपे, तालुका शाहुवाडी, जि. कोल्हापूर) हे सैन्य भरतीच्या बंदोबस्तासाठी तेथे नेमणुकीला होते. बंदोबस्त करीत असताना त्यांनी आपले सर्व्हिस रिव्हॉल्व्हर आणि १० राऊंड असलेले सॅकमध्ये ठेऊन दुचाकीला लावून ठेवली. या भरतीला पश्‍चित महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यातील उमेदवार आणि त्यांचे नातेवाईक आले होते. उमेदवारांच्या नातेवाईकांना आवरण्यात पोलिस उपनिरीक्षक भिमराव पाटील व्यस्त होते. याचा फायदा घेऊन सातारा येथील श्रीधर कुंभार यांनी ही सॅक चोरून नेली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.  

दोन वर्षे रिव्हॉल्व्हर संशयिताने वापरले. त्यानंतर त्याने ते रिव्हॉल्व्हर स्वयंभू मेघराज शिंदे याला विकण्याचे ठरविले. तसे ठिकाण ठरले. याची खबर शहर पोलिस आणि सातारा पोलिसांना मिळाली. त्यांनी काल (ता. १३) रात्री सापळा रचून दोन्ही संशयितांना पकडले.    

श्रीधर कुंभार याने चोरलेल्या रिव्हॉल्व्हरचा पूरेपुर वापर करून घेतला. हौसेखातर तो शेतात रिव्हॉल्व्हर घेऊन जात होता. त्याने दोन वर्षांमध्ये १० च्या १० राऊंड उडवले. काही हवेत मारले तर काही झाडांवर मारल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. जप्त केलेल्या रिव्हाल्व्हरचे नंबर रत्नागिरीला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संशयितांना शहर पोलिसांच्या स्वाधिन केले आहे.

Web Title: Ratnagiri News two arrested in revolver thief case