कामथे घाटात आगार प्रमुखासह दोघे ट्रकखाली सापडून ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

चिपळूण - कामथे घाटात उलटलेल्या कोळशाच्या ट्रकखाली सापडून दोघेजण ठार झाले. यामध्ये चिपळूणचे आगारप्रमुख रमेश शिलेवंत आणि एका बोअरवेल चालकाचा समावेश आहे. दैव बलवत्तर म्हणून एसटीचे आठजण बचावले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. 

चिपळूण - कामथे घाटात उलटलेल्या कोळशाच्या ट्रकखाली सापडून दोघेजण ठार झाले. यामध्ये चिपळूणचे आगारप्रमुख रमेश शिलेवंत आणि एका बोअरवेल चालकाचा समावेश आहे. दैव बलवत्तर म्हणून एसटीचे आठजण बचावले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. 

मलकापूर (जि. कोल्हापूर) येथून साखरपामार्गे परेलकडे (मुंबई) जाणाऱ्या एसटीला सकाळी १०.४५ वाजता कामथे घाटात बोअरवेलची सर्व्हिस देणाऱ्या ट्रकची धडक बसली. दुपारनंतर या अपघाताचा पंचनामा करण्यासाठी चिपळूणचे आगारप्रमुख
रमेश शिलेवंत यांच्यासह आठ कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. डाव्या बाजूला एसटी आणि उजव्या बाजूला बोअरवेलची सर्व्हिस देणारा ट्रक उभा होता. एसटीपासून काही अंतरावर अपघाताचा पंचनामा सुरू होता.

तेथे  शिलेवंत यांच्यासह मलकापूर-परेल एसटीचे चालक आणि ट्रकचालक राजू जमादार (वय ३८) उपस्थित होते. सावर्डेहून चिपळूणच्या दिशेने कोळशाची वाहतूक करणारा ट्रक भरधाव वेगाने आला. या ट्रकला पाहून पंचनाम्याच्या ठिकाणी असलेल्या लोकांची पळापळ सुरू झाली. ट्रकचालक लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होता. त्याचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक डाव्या बाजूला कलंडला. ट्रकमध्ये ४० टन कोळसा भरला होता. त्याच्या ढिगाराखाली शिलेवंत आणि जमादार सापडले. अपघाताच्या ठिकाणी लोकवस्ती नसल्यामुळे वेळीच मदतकार्य सुरू झाले नाही.

घटनास्थळी असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी दूरध्वनी करून मदतकार्याची मागणी केली. महामार्गावरून जाणारी वाहनेही थांबविली. अनेकांनी मदतकार्य सुरू केले. परंतु सर्वांचे प्रयत्न अपुरे पडले. कोळसा बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे, एसटीच्या विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के, पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर, तहसीलदार जीवन देसाई घटनास्थळी दाखल झाले.

अपघाताच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली होती. तसेच वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. गर्दी हटवण्यासाठी तसेच वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान जमादार यांचा मृतदेह बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले. रुग्णवाहिकेतून तो कामथे रुग्णालयात पाठविला. त्यानंतर कोळशाच्या ढिगाऱ्याखाली असलेले मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. जमादार वगळता कोळशाच्या ढिगाऱ्याखाली दोन मृतदेह आहेत असा सर्वांचा अंदाज होता.

साडेचार वाजता दोन खासगी क्रेन मागवून ट्रक उचलण्याचा प्रयत्न झाला. मात्र कोळशाने भरलेला ट्रक दोन क्रेनने उचलता येत नव्हता, म्हणून जेसीबी मागविला. जेसीबी आणि दोन क्रेनच्या साह्याने ट्रक उचलून बाजूला ळेला. त्यानंतर जेसीबीने कोळशाचा ढिगारा उपसला. तासाच्या प्रयत्नानंतर शिलेवंत यांचा मृतदेह कोळशाच्या ढिगाऱ्याखाली सापडला. अपघातानंतर तीन तास शोधमोहीम आणि मदतकार्य सुरू होते. शिलेवंत यांचा मृतदेह मिळाल्यानंतर दोन्ही बाजूने हळूहळू वाहने सोडली. या घटनेतील अपघातग्रस्त कोळसा वाहतूक ट्रकचा चालक रमेश कोंढ (रा. जयगड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

‘‘एसटी व कंटेनरच्या अपघाताचा पंचनामा करताना ९ जण घटनास्थळी होतो. भरधाव वेगाने येणारा ट्रक पाहिल्यानंतर आमची पळापळ सुरू झाली. प्रत्येकजण ट्रकपासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत होता. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी रस्त्यालगत असलेल्या गटारात उड्या टाकल्या. केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो.’’ 
- मुन्ना कदम, कर्मचारी, चिपळूण आगार

अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी
चिपळूणचे आगारप्रमुख रमेश शिलेवंत अपघातात ठार झाल्याचे समजल्यानंतर चिपळूण आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरीही कर्मचाऱ्यांनी आगाराच्या कामकाजावर अपघाताचा कोणताही परिणाम होऊ दिला नाही. 
 

Web Title: Ratnagiri News two dead in an accident in kamathe Ghat