ज्याचे चित्र रेखाटायचे ती व्यक्तिरेखा अंगात भिनते - वैभव चव्हाण

शिरीष दामले
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

चिपळूण - व्यक्तिचित्र रेखाटताना त्या व्यक्तीमधील नेमके वैशिष्ट्य, चेहऱ्यावर उमटणारा स्वभाव, लकबी, चेहऱ्यावर विविध प्रसंगात उमटणारे हावभाव नेमकेपणाने व्यक्त झाले की चित्र हुबेहूब येते. माझ्यासाठी चित्र रेखाटताना ती व्यक्तिरेखा कदाचित माझ्यात काहीवेळा भिनत असते, असे सांगत शब्दांपेक्षा पेन्सिलीद्वारेच व्यक्त होणे सोपे आहे. ‘सकाळ’ने मला माझीच नव्याने ओळख करून दिली. तशीच चिपळूणकरांनाही अशा भावगर्भ शब्दांत वैभव चव्हाण यांनी रेखाटनातील मर्म सांगितले. 

‘सकाळ’च्या चिपळूण विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त वैभव चव्हाण यांनी रेखाटलेल्या १६५ चित्रांचे प्रदर्शन झाले. त्यानिमित्त ते ‘सकाळ’शी ते बोलत होते. याबाबत त्यांनी दोन झकास किस्से सांगितले. त्यातून चव्हाण चित्रातील व्यक्तिरेखेशी कसे एकरूप होतात हे कळले. निळू फुले यांनी रांगडा पुढारी रंगवला.

पुढाऱ्याचा बेरकेपणाही ते दाखवत. ‘बाई वाड्यावर या’ हा त्यांचा संवाद प्रसिद्धच आहे. निळू फुले रेखाटताना अस्वस्थपणे तो संवाद अनाहूतपणे मी बोलत होतो. थोड्या वेळाने चित्र पुरे झाले. पत्नी तृप्तीने पसंतीची मान डोलावली. याचवेळी त्यांचा छोटा मुलगा ओम बालसुलभ पद्धतीने वैभव म्हणत असलेला संवाद म्हणत होता. त्यामुळे साऱ्यांची हसून मुरकुंडी वळली. 

ते म्हणाले, ‘‘श्री ४२० आणि मेरा नाम जोकरसारख्या चित्रपटातील राज कपूरची केविलवाणी मुद्रा, नाना पाटेकरांचा वैभव हरवलेला नटसम्राट, शरद पवार यांचा भारदस्तपणा रेखाटनात उतरला आहे. भीमसेन जोशींच्या चेहऱ्यावर दिव्यांचा प्रकाश पडलेला होता. मात्र त्याचवेळी गातानाची त्यांची एकरूपता मनात कुठेतरी बिंबली होती. ती हातातून आपोआप उमटली.’’

वैभव यांच्या मातोश्री सौ. स्मिता आणि बहीण ॲड. नयना त्यांच्यासोबत चित्रे काढत असत. मात्र चित्रकलेचा वारसा त्यांना त्यांच्या मामांकडून मिळाला. शाळकरी वयात सुरू झालेली चित्रकला मध्येच थांबली आणि पुन्हा एकदा आतून काय उफाळून आले ते गेल्या तीन वर्षात त्यांनी साडेतीनशे चित्रे रेखाटली. यापैकी दोनशे चित्र लोक घेऊन गेले आहेत.

आषाढी एकादशीला पांडुरंगाची होणारी पूजा ते भक्तिभावाने दूरदर्शनवर पाहत होते. मध्येच तंद्री लागली आणि पूजा संपेपर्यंत वैभवने भिंतीवर कटेवर कर घेऊन विटेवर उभा असलेला पांडुरंग घरातील भिंतीवर रेखाटला होता. ही माझी कला आज चिपळूणकरांसमोर ‘सकाळ’मुळे आली आणि मलाच माझा शोध नव्याने लागला, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Web Title: Ratnagiri News Vaibhav Chavan comment