भूमिहीन महिलांची शेती पाहून थक्क झालो - विकास पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

चिपळूण - इथे अल्पभूधारक आणि भूमिहीन महिलांनी उभी केलेली शेती पाहून थक्‍क झालो. शेती अभ्यासक्रमाच्या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी येथील अल्पशिक्षित महिलांनी ज्या पद्धतीने केल्या आहेत, ते वाखाणण्याजोगे आहे. कृतियुक्‍त अनुभव असणाऱ्या मंडळींनी पुढे यायला हवं आणि अन्नपूर्णासारख्या वास्तववादी पथदर्शी पर्यायांची मांडणी करायला हवी, असे प्रतिपादन कोकण विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी केले.

दिशान्तर संस्थेने उभारलेल्या अन्नपूर्णा प्रकल्पस्थळी शिवार फेरीचे आयोजन केले होते. वेहेळे-राजवीरवाडी येथे प्रगती व भाग्यश्री शेती गटातील महिलांच्या शेतीची पाहणी करण्यासाठी चिपळुणातून विविध क्षेत्रातील प्रभृतींनी उपस्थिती लावली होती. सहकारातून, सामुदायिक, महिलांनी केलेली सेंद्रिय शेती याच जोडीने दलालमुक्‍त विक्री व्यवस्थेसाठी शेतकऱ्यांनीच पिकवायचं नि शेतकऱ्यांनीच विकायचं अशा पंचसूत्रीवर आधारित साडेसतरा एकर क्षेत्रावर शेती करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या पालेभाज्या, कोबी, फ्लॉवर, वांगी, मिरची, भोपळी मिरची, पावटा, कारली, दोडकी, वाल, काकडी, दुधी, पडवळ, कोथिंबीर, भेंडी ते अगदी कलिंगडपर्यंतचे पीक इथे उभे ठाकले आहे. 

यानंतर झालेल्या कार्यक्रमात श्री. पाटील पुढे म्हणाले की, 
जागेचे सुयोग्य नियोजन, कामाची विभागणी, आंतरपीक पद्धती, नैसर्गिक कीड रोग नियंत्रण या बाबी प्रत्यक्ष उभ्या ठाकलेल्या पाहून समाधान वाटले. कामाच्या पुढच्या टप्प्यात कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पाण्याचे सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन या बाबींचा समावेश करावा, असा सल्ला त्यांनी दिला. 

महिला सक्षमीकरण आणि उपजीविका विकास यांचा उत्कृष्ट संयोग म्हणजे दिशान्तर संस्थेचा अन्नपूर्णा प्रकल्प असल्याचे 
संस्थेच्या सीमा यादव यांनी सांगितले. अन्नपूर्णा प्रकल्पाच्या शेतमाल विक्रीचा स्टॉल चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरात सुरू करण्यात आला.

Web Title: Ratnagiri News Vikas Patil comment