गावच्या एकीने धावली एसटी

राजेश शेळके
सोमवार, 18 जून 2018

रत्नागिरी - जांभरूण गावाने एकीचे बळ दाखवत श्रमदानातून रस्त्याचे खड्डे भरून जिल्हा परिषद, प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. आठ दिवस बंद झालेली एसटी वाहतूक आता पुन्हा सुरू झाली.   

रत्नागिरी - जांभरूण गावाने एकीचे बळ दाखवत श्रमदानातून रस्त्याचे खड्डे भरून जिल्हा परिषद, प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. आठ दिवस बंद झालेली एसटी वाहतूक आता पुन्हा सुरू झाली.   

तालुक्‍यातील अंतर्गत रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. निधी मंजूर असूनही संबंधित विभाग,ठेकेदारांनी आचारसंहितेचा बाऊ करून ही कामे रखडली. त्याचा फटका तालुक्‍यातील जांभरूण गावाला बसला. खराब रस्त्यामुळे एसटीने वाहतूक बंद केली.आठ दिवस ग्रामस्थांना २ किमी पायपीट करावी लागली. हातावर हात ठेवून न थांबता गावकऱ्यांनी श्रमदान केले.जांभरूण ग्रामस्थांच्या या विधायक योगदानातून संबंधित विभाग जागे होतील,अशी अपेक्षा आहे. तालुक्‍यातील अनेक गावांची हीच परिस्थिती आहे.

अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर आचारसंहितेचा पडदा पडल्याने लोकप्रतिनिधींच्या रेट्याची आता गरज आहे. जांभरूण ग्रामीण भागातही दुर्गम आहे. साधारण ६०० च्या दरम्यान वस्ती आहे. एसटी हेच दळणवळणाचे मुख्य साधन आहे. मुख्य बाजारपेठ दोन ते अडीच किमीपर्यंत आहे. मात्र या रस्त्याची चाळण झाल्याने एसटी महामंडळाने आठ दिवसापूर्वी वाहतूक बंद केली. शाळा, कॉलेज, बाजारहाटाला खीळ बसली. गावकऱ्यांनी श्रमदानाने तीन, चार दिवसात खड्डे भरले. एसटीने पाहणी करून वाहतूूक सुरू केली. जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनाने पायाभूत सुविधांसाठी आचारसंहितेचा बाऊ करू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

उदय सामंत यांच्या आमदार निधीतून जांभरूण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ८ लाख मंजूर आहेत. ठेकेदाराकडून वेळीच काम न झाल्याने गावकऱ्यांवर पायपीट करण्याची वेळ आली. ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाकडे दाद मागितली आहे.
-गजानन पाटील, 

पंचायत समिती सदस्य

 

Web Title: Ratnagiri News villagers unity for Road Repair