ऑक्‍सिजनविरहित झोनमुळे मासे किनाऱ्यावर - डॉ. विनय देशमुख

ऑक्‍सिजनविरहित झोनमुळे मासे किनाऱ्यावर -  डॉ. विनय देशमुख

रत्नागिरी -  पाण्याचे बदलते प्रवाह आणि वाऱ्याचा वेग यामुळे समुद्राच्या तळात असलेला ऑक्‍सिजनविरहित झोन (ओएमझेड) पृष्ठभागाकडे येऊ लागला आहे. अरबी समुद्रात हा झोन आढळून आला आहे. ओएमझेडमुळे दिघीपाठोपाठ पूर्णगडमध्ये रात्रीच्या वेळी अचानक मासळीचे थवे किनाऱ्यावर सापडले, असा दावा मत्स्य संशोधक डॉ. विनय देशमुख यांनी व्यक्‍त केला. हे बदल यावर्षीच कसे दिसू लागले यावर संशोधन सुरू असल्याचे त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

गुरुवारी (ता. ३) रात्री अचानक पूर्णगड येथील खाडीत माशांच्या झुंडीच्या झुंडी सापडू लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. निसर्गाच्या चमत्कारामुळे ग्रामस्थांमध्ये काहीतरी अघटित घडणार असल्याची चर्चा सुरू झाली. प्रत्येकजण आपापले तर्कवितर्क लढवत होते. काहींनी तर ही सुनामीची शक्‍यता असल्याचे बोलून दाखवले. पौर्णिमा होऊन गेल्यामुळे समुद्रासह खाडीच्या पाण्याला करंट आहे. समुद्राच्या तळातील अंतर्गत हालचाली दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यावर राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था आणि केंद्रीय समुद्री मासेमारी संशोधन संस्था एकत्रितपणे अभ्यास करत आहे. त्याचा अहवालही शासनाला पंधरा दिवसांपूर्वी सादर केला आहे. यावर्षी कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांना बंपर मासळीचा लाभ झाला आहे. तसेच हाताने पकडता येतील अशी मासळी किनारी भागात आढळून आल्याचे दोन प्रकार दिघी आणि पूर्णगड येथे घडले. याला वैज्ञानिक कारणे असल्याचे मत्स्य संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

अरबी समुद्राच्या तळाशी ऑक्‍सिजनविरहित झोनचा मोठा भाग आहे. ८०० ते १००० मीटर खोल समुद्रात तो आढळून येतो. पावसाळ्यानंतर हा थर अंतर्गत हालचालीमुळे पृष्ठभागावर येत आहे. त्यामुळे या भागातील मासळी ऑक्‍सिजनसाठी तडफडू लागते. माशांच्या झुंडी ऑक्‍सिजन मिळविण्यासाठी सुरक्षित भागाकडे वळतात. पाण्याचे प्रवाह आणि वाऱ्याच्या दिशेने ही मासळी पुढे सरकते. हीच स्थिती कोकण किनारपट्टीवर निर्माण झाली आहे. ऑक्‍सिजन मिळविण्यासाठी ही मासळी पूर्णगड खाडीच्या दिशेने सरकली असावी, असे मत्स्य संशोधकांकडून सांगितले जात आहे; परंतु यावर्षीच ही परिस्थिती कशी उद्‌भवली यावर सागरी संशोधन केंद्र अभ्यास करीत आहे. तसेच हे चित्र भविष्यात वारंवार पाहायला मिळेल, असा दावाही मच्छीमारांनी केला आहे.

तापमानवाढ ओएमझेडचे कारण
जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राचे तापमान एक अंश डिग्री सेल्सिअसने वाढले आहे. हा बदल अल्प असला तरीही त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. हवामानातील बदल आणि तापमानातील वाढीमुळे ऑक्‍सिजन धरून ठेवण्याची पाण्याची क्षमता कमी होते. त्यातून ओएमझेडचे (ऑक्‍सिजन मिनिमम झोन) थर वाढतात, असा संशोधकांचा अंदाज आहे. हा थर पसरत गेला तर २०४७ पर्यंत समुद्रात मच्छीच राहणार नाहील अशी भीतीही व्यक्‍त केली आहे.

सुनामीची शक्‍यता नाही
अरबी समुद्रात सुनामी उठण्याची शक्‍यता नाही, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले. समुद्राच्या तळात हालचाली होत असल्या तरीही अरबी समुद्रात जिवंत ज्वालामुखी नाही. सध्या सापडत असलेली मासळी ही समुद्रातील अंतर्गत बदलाचाच परिणाम असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com