गुजरातच्या लॅण्डमाफीयांना मोठे करण्यासाठीच रिफायनरी प्रकल्प - राऊत

राजेश कळंबटे
मंगळवार, 9 जानेवारी 2018

 नाणार (राजापूर) येथील रिफायनरी प्रकल्प हा गुजरातच्या लॅण्डमाफीयांना मोठे करण्यासाठी आणला गेला आहे. त्याचा पर्दाफाश आम्ही येत्या काही दिवसात करणार आहोत.

-  विनायक राऊत, खासदार 

रत्नागिरी - नाणार (राजापूर) येथील रिफायनरी प्रकल्प हा गुजरातच्या लॅण्डमाफीयांना मोठे करण्यासाठी आणला गेला आहे. त्याचा पर्दाफाश आम्ही येत्या काही दिवसात करणार आहोत. याच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट संबंध आहे का ते माहिती नाही. ते गुजरातचे असल्यामुळे तो योगायोगही असू शकतो, असे शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. रिफायनरीला शिवसेनेचा विरोधच असून कोकणात कोठेही हा प्रकल्प येऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

श्री. राऊत म्हणाले, रिफायनरी प्रकल्प घातक आहे. त्याचा विपरित परिणाम कोकण किनारपट्टीवर होऊ शकतो. त्यासाठी शिवसेनेने त्याला विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पासाठीचा शासनाचा अट्टाहास म्हणजे कोकण विकासाचा कि गुजरातच्या लॅण्डमाफींयाच्या विकासाचा असा प्रश्‍न पडला आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र दिले आहे. अधिवेशनातही आवाज उठविला आहे. आतापर्यंत खरेदी झालेल्या अडीच हजार एकर जमीनीपैकी दोन हजार एकर जमीन गुजरातच्या लॅण्डमाफियांनी खरेदी केली आहे. या लोकांची नावानिशी यादी लवकरच जाहीर केली जाईल. दोन, तीन लाख रुपयांनी जमीन घ्यायची आणि शासनाच्या पॅकेजमधील रकमेने ती विकायची हाच त्यांचा व्यावसाय आहे. त्यातून हे लॅण्डमाफीया गब्बर होणार आहेत. कोकण खाक होणार आणि रांगोळी मात्र गुजरातमध्ये रंगणार अशी स्थिती रिफायनरीमुळे निर्माण झाली आहे. त्याचा स्थानिकांना काहीच फायदा नाही, असे श्री. राऊत यांनी स्पष्ट सांगितले.

रिफायनरी प्रकल्प येऊ घातल्याचे लक्षात आल्यानंतर जमीन व्यवहार बंद करावयास पाहिजे होते. नियमानुसार ही कार्यवाही करणे गरजेचे होते; परंतु अधिसूचना झाली तरीही खरेदी-विक्री सुरुच ठेवली होती. हे प्रथमच घडले असून गुजरातच्या लॅण्डमाफीयांना मोकळे रान मिळावे यासाठीच केल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला आहे. 

Web Title: Ratnagiri News Vinayak Raut comment