वालम, चव्हाण यांना जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

राजापूर - रिफायनरी प्रकल्पावरून झालेल्या हाणामारी प्रकरणातील संशयित आरोपी आणि कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संषर्घ समितीचे अध्यक्ष अशोक वालम आणि मंगेश चव्हाण यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

राजापूर - रिफायनरी प्रकल्पावरून झालेल्या हाणामारी प्रकरणातील संशयित आरोपी आणि कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संषर्घ समितीचे अध्यक्ष अशोक वालम आणि मंगेश चव्हाण यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. श्री. वालम यांच्या पत्नी अश्‍विनी वालम या अन्य एका गुन्ह्यामध्ये न्यायालयाला शरण आल्यानंतर त्यांचीही पंधरा हजारांच्या जामिनावर सुटका झाली. 

तालुक्‍यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने कुंभवडे येथे बैठक सुरू असताना त्यांच्याबद्दल वक्तव्य केल्याबद्दलचा जाब विचारण्यासाठी पंढरीनाथ आंबेरकर हे गेले होते. त्यावेळी बाचाबाची होऊन हाणामारी झाली. त्यामध्ये श्री आंबेरकर जखमी झाले. सध्या ते रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत.

या प्रकरणी श्री. आंबेरकर यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार श्री. वालम, मंगेश चव्हाण, सौ. वालम यांच्यासह अन्यांनाविरोधात गुन्हा दाखल केला होता.  त्यापैकी सौ. वालम यांना राजापूर न्यायालयाने काल जामीन मंजूर केला होता. मात्र, या गुन्ह्यामध्ये श्री. वालम आणि श्री. चव्हाण यांना सायंकाळी पोलिसांनी अटक केली होती. त्या दोघांनाही आज येथील न्यायालयात हजर केले. श्री. वालम यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे न्यायालयात नेण्यासाठी व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला . त्यानंतर न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर श्री.वालम आणि श्री. चव्हाण यांना प्रत्येकी पंधरा हजारांचा जामीन मंजूर झाला.

दरम्यान, नाटे पोलिस ठाण्यात बेकादेशीररीत्या प्रवेश केल्याप्रकरणी सौ. वालम यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामध्ये त्यांनी आज न्यायालयापुढे शरणागती पत्करली. त्यांनाही पंधरा हजारांचा जामीन मंजूर झाला. त्यांना दर रविवारी नाटे पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

दरम्यान, श्री. वालम यांना आज पोलिसांकडून न्यायालयात हजर केले जाणार असल्याने दुपारनंतर प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती. न्यायालयाचा निकाल लागून ते बाहेर येईपर्यंत लोक न्यायालयाबाहेर थांबले होते. जामीन मंजूर झाल्यानंतर श्री. वालम यांनी थेट घर जाणे पसंत केले. त्यानंतर जमलेले लोकही घरी परतले.

Web Title: Ratnagiri News Waalam, Chavan get bail