पाचाडमध्ये डोंगरावर खड्डे खोदून लाखो लिटर पाणी जिरवले 

नागेश पाटील
सोमवार, 4 जून 2018

चिपळूण - तालुक्यातील पाचाड-चिवेलीवाडी येथील चाकरमानी तरुण व ग्रामस्थांनी जलसंधारणाचा प्रयोग यशस्वी केला आहे. डोंगर भागात मोठे खड्डे खोदून पावसाचे लाखो लिटर पाणी जिरवले. यातून दरवर्षी मेमध्ये कोरड्या पडणार्‍या विहिरी भरल्या आहेत. उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी झगडणार्‍या ग्रामस्थांना आता मुबलक पाणी मिळाले आहे. 

चिपळूण - तालुक्यातील पाचाड-चिवेलीवाडी येथील चाकरमानी तरुण व ग्रामस्थांनी जलसंधारणाचा प्रयोग यशस्वी केला आहे. डोंगर भागात मोठे खड्डे खोदून पावसाचे लाखो लिटर पाणी जिरवले. यातून दरवर्षी मेमध्ये कोरड्या पडणार्‍या विहिरी भरल्या आहेत. उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी झगडणार्‍या ग्रामस्थांना आता मुबलक पाणी मिळाले आहे. 

पाचाड चिलेवाडी, घोलेवाडी, विठ्ठलवाडी येथील विहीर मे महिन्यात कोरड्या पडत होत्या. उन्हाळ्यात एक दिवसाआड पाणी मिळायचे. गावाची पाणी टंचाईतून सुटका करण्याचा चंग वाडीतील मुंबई, पुणेस्थित चाकरमान्यांनी बांधला. शैलेश चिले व रोहन चिले या तरुणांनी  डॉ. अविनाश पोळ यांच्यापासून प्रेरणा घेऊन गावातील चाकरमान्याची मुंबईत बैठक घेतली. 20 ते 22 तरुणांच्या चमुने चिवेलीवाडीस लागून असलेल्या डोंगरात पावसाचे पाणी खड्डे खोदून जिरवण्याचा निर्णय घेतला. एप्रिल 2017 मध्ये सुरवात झाली. चाकरमानी आणि तरुणांनी श्रमदानातून 10 बाय दहाचे 10चे खड्डे खोदले. डोंगर भागातच चर खोदून पावसाचे पाणी खड्ड्यात आणले. असे 15 खड्डे खोदून दहा लाखाहून अधिक लिटर पाणी जिरवण्यात आले.

मोठ्या खड्ड्यासोबत पाच ठिकाणी आयत आकाराचे सीसीटी खोदण्यात आले. तेथेही पाणीसाठा करून ते जिरवले. खड्डे मोठे असल्याने त्यात कोणी पडून जीवितहानी होऊ नयेसाठी यासाठी कुंपण घालण्यात आले. या कामाचा परिणाम म्हणून यावर्षी मे महिन्यात वाडीतील दोन्ही विहीरींमध्ये मुबलक पाणीसाठा झाला.

जलसंधारणाच्या कामासाठी त्यांनी शनिवार, रविवारच्या सुट्ट्याचा उपयोग केला. त्यांच्या जोडीला वाडीतील तरुणांची साथ मिळते. गतवर्षी एप्रिल मध्येच सुट्टीच्या कालावधीत त्यांनी 15 खड्डे खोदले. यात लाखो लिटर पाणी जिरल्याने फलदायी परिणाम जाणवले आहेत. चिलेवाडी, घोलेवाडी, विठ्ठलवाडी येथील लोकसंख्या 700 इतकी आहे. ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेची विहीर कळवंडेत आहे. उन्हाळ्यात दिवसाआड पाणी मिळायचे, तर चिलेवाडीतील विहिरीतून प्रत्येक कुटुंबांनी 5-5 हंडे पाणी काढले तर ते संपून जायचे. एप्रिल मे मध्ये 4 फूट पाणी असायचे. आता याच विहिरीत 20 फूट पाणी पातळी आहे.

वर्षभरात डोंगरातील खड्ड्यात लाखो लिटर पाणी जिरले. परिणामी सखल भागातील विहीरीं तुबुंल भरल्या. राकेश चिले, शैलेश चिले, माजी सरपंच संदीप चिले, सदाशिव चिले, प्रल्हाद मिरगल, रूपेश चिले, अक्षय चिले, रोहेश चिले, नितीन चाचे, यांच्यासह वाडीतील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, महिलांनी स्थिती बदलण्यासाठी  जलसंधारणाच्या कामात योगदान दिले. 

भरपूर पाऊस पडूनही अनेक गावात पाणी टंचाई जाणवते. गाव पाण्याने समद्ध करण्यासाठी तरुणांनी हे पाऊल टाकले आहे. पहिल्या टप्प्यात खोदलेल्या 15 खड्ड्याचा प्रयोग यशस्वी झाला. वाडीला पाणी टंचाई जाणवली नाही. दरवर्षी काम सुरूच राहणार आहे. 

- शैलेश चिले, पाचाड चिलेवाडी (चाकरमानी)

शासकीय योजनेचा लाभ न घेता श्रमदानातून जलसंधारण कामास सुरवात केली. नोकर्‍या सांभाळून सुट्टीच्या दिवशी श्रमदान केले. ग्रामस्थांची चांगली साथ मिळाली. गावात कायमस्वरूपी पाणी वाहते राहील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डोंगरभागातील जलसधारणाचे काम सुरूच राहिल.

- राकेश चिले, पाचाड चिलेवाडी (चाकरमानी) 

 

Web Title: Ratnagiri News water conservation Movement In Pachad