टॅंकरने पाणी 56 वाड्यांमध्ये

टॅंकरने पाणी 56 वाड्यांमध्ये

रत्नागिरी - जिल्ह्यात २९ गावांतील ५६ वाड्यांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. याचा लाभ सुमारे साडेसात हजार ग्रामस्थांना मिळत आहे; मात्र अनेक गावांमध्ये आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

मे महिन्याच्या अखेरीस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. खेड, चिपळूण, संगमेश्‍वर आणि लांजा या चार तालुक्‍यात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उर्वरित पाच तालुके टॅंकरमुक्‍त करण्यात प्रशासनाला यश आले. टॅंकरची मागणी आल्यानंतर प्रथम पर्यायी व्यवस्था केली जाते. जवळच्या विहिरीवरून पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होतो. त्यात यश आले नाही, तर टॅंकरचा अवलंब होतो. धनगरवाड्यांमध्ये याचा उपयोग होतो. डोंगराळ किंवा समुद्रकिनारी वाड्यांना टंचाईची झळ बसते.

रत्नागिरी तालुक्‍यातील वरवडे गावातील तीन वाड्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तेथील ग्रामपंचायतींकडून स्थानिक विहिरीतून खासगी टॅंकरने पाणी उपलब्ध करून दिले. पाण्याचे साठे कोरडे पडत असल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. मॉन्सून लांबला तर जिल्ह्यात टंचाईची तीव्रता वाढेल, अशी शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये 51 टक्‍के पाणीसाठा
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीटंचाईचा आगडोंब कमी प्रमाणात जाणवत आहे; मात्र पाऊस लांबला तर अखेरच्या टप्प्यात अनेक गावांमध्ये टॅंकरची मागणी वाढेल, अशी स्थिती आहे. जिल्ह्यातील ४५ पाटबंधारे प्रकल्पात ५१ टक्‍के पाणीसाठा आहे. तसेच एमआयडीसीअंतर्गत पाचपैकी तीन बंधाऱ्यांतील साठा संपुष्टात आला आहे. शिल्लक दोन धरणात सरासरी चाळीस टक्‍के साठा आहे.
जिल्ह्यातील ४५ पाटबंधारे प्रकल्पात उपयुक्‍त साठा ४१४ दलघमी असून आजचा साठा २१४ दलघमी आहे. फणसवाडी, मालघर या धरणात पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. पारा ३४ ते ३६ अंश सेल्सिअसमध्ये राहिला असून कडाक्‍याच्या उन्हाने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. पाण्याचा वापर आणि बाष्पीभवन यामुळे साठा घटत आहे. गतवर्षी रत्नागिरी विभागातील २८ धरणांमध्ये ३४ टक्‍के साठा होता. यावर्षी तो ३८ टक्‍केपर्यंत आहे. नातूवाडी, गडनदी आणि अर्जुना धरणात ६४ टक्‍के साठा असल्यामुळे त्याचा फायदा आजूबाजूच्या गावांना होईल.

एमआयडीसीची धुरा हरचेरी, निवसरवर ः एमआयडीसीची रत्नागिरी विभागात पाच धरणे आहेत. त्यातील घाटिवळे, अंजणारी व असोडेतील साठा संपुष्टात आला आहे. निवसर, हरचेरीत पाणी उपलब्ध आहे. हरचेरी धरणावर रत्नागिरी पालिका, शिरगाव, कुवारबाव, मिऱ्या, नाचणे, मिरजोळे, कर्ला ग्रामपंचायती अवलंबून आहेत. पालिकेला दोन एमएलडी, ग्रामपंचायतीला १.३३ एमएलडी आणि इतर ०.७७ एमएलडी पाणी दररोज दिले जाते. त्यात कुवारबावला पावणेपाच लाख लिटर पाणी मिळते. मे अखेरपर्यंत हा साठा पुरू शकतो. परिस्थिती पाहून कपातीचा निर्णय घेतला जाणार आहे.

पाईपलाईन अचानक फुटते 
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणावरील पाईपलाईन अचानक फुटत असल्याने पालिकेपुढे मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काल (ता. १४) दिवसभर शिळ फाटा स्टॉपजवळ फुटलेल्या पाईपमधून हजारो लिटर पाणी वाहून जात होती. सायंकाळपर्यंत त्यावर उपाययोजना झाली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com