राजापूर तालुक्यात पाच वाड्यांची दीड महिन्यापासून टँकरची मागणी 

राजेंद्र बाईत
सोमवार, 21 मे 2018

राजापूर - गेल्या दीड महिन्यापासून तालुक्यातील तीन गावातील पाच वाड्यांमधील सुमारे तीनशे लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या गावांना अद्यापही टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. जिल्ह्यातील अन्य तालुक्यामध्ये टँकर धावत आहेत. राजापूर तालुक्यात पाणीटंचाई स्थिती नसल्याचे चित्र कागदोपत्री रंगविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यावर्षीही तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा पोहचल्या आहेत. तालुक्यातील तीन गावे आणि पाच वाड्यांनी पंचायत समिती प्रशासनाकडे गेल्या दीड महिन्यांपासून टँकरची मागणी केली आहे. यामध्ये मंदरूळ येथील बौद्धवाडी, तळगाव येथील नवानगर, कुळ्येवाडी, तांबटवाडी, गावपडवे यांचा समावेश आहे. दिवसागणिक टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची भर पडत आहे. टंचाईग्रस्त गावांची तहसीलदार आणि गटविकास अधिकार्‍यांनी संयुक्त पाहणी केल्यानंतर संबंधित गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्याप्रमाणे गेल्या आठवड्यामध्ये संयुक्त पाहणी झाली. मात्र अद्यापही संबंधित गावांमध्ये पाण्याचा टँकर धावलेला नाही. 

लोकप्रतिनिधी मूग गिळून 

निवडणूक आली की मतांचा जोगवा मागण्यासाठी राजकारणी, लोकप्रतिनिधी उंबरठे झिजवितात. एखादा अधिकारी वा कर्मचार्‍याने चुकीचे काम केल्यास बेंबीच्या देठापासून लोकप्रतिनिधी, त्याच्या विरोधात ओरड करून आपण जनतेचे एकमेव तारणहार असल्याचे भासवितात. मात्र पाणीटंचाईबाबत  ते मूग गिळून आहेत. 

Web Title: Ratnagiri News water Scarcity in Rajapur Taluka