देवरूख तालुक्यातील उजगावमधील ११ वाड्यांवर पाणीटंचाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

देवरूख - पाणी योजना सुरू झाल्यापासून तिच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधीच मिळत नसल्याने तालुक्‍यातील उजगावमधील ११ वाड्यांचा पाणीप्रश्‍न ऐरणीवर आला आहे. धरण उशाशी आणि कोरड घशाशी असे म्हणण्याची वेळ या ग्रामस्थांवर आली आहे.

देवरूख - पाणी योजना सुरू झाल्यापासून तिच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधीच मिळत नसल्याने तालुक्‍यातील उजगावमधील ११ वाड्यांचा पाणीप्रश्‍न ऐरणीवर आला आहे. धरण उशाशी आणि कोरड घशाशी असे म्हणण्याची वेळ या ग्रामस्थांवर आली आहे.

शासनाचे दुर्लक्ष आणि विविध सोयी-सुविधांच्या अभावामुळे संगमेश्‍वर तालुक्‍यातील उजगाव या गावचा विकास मंदावला आहे. गावच्या विकासकामांसाठी शासनाकडून कोणताच निधी मिळत नसल्याने येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्ता, आरोग्यविषयक समस्यांबरोबरच सध्या पाणीप्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

देवरूख शहरापासून सुमारे १८ किमी अंतरावर उंच-सखल भागावर हे गाव वसले आहे. या गावाला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहे. सुमारे २ हजार २०० इतकी या गावची लोकसंख्या असून शेवरवाडी, ब्राह्मणवाडी, बौद्धवाडी, बडदवाडी, गुरववाडी, सुतारवाडी, तेलेवाडी, कानसरेवाडी, नवेलेवाडी, भोवरीचीवाडी, पिंगळेवाडी व गवळवाडी या वाड्यांचा समावेश आहे.

या गावामध्ये १९९५ मध्ये सुरू केलेल्या नळपाणी योजनेचा लाभ गावातील शेवरवाडी वगळता उर्वरित ११ वाड्यांतील सुमारे १ हजार ५०० नागरिक घेत आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेतील लोखंडी व सिमेंट पाइपलाइनची दुरुस्ती न झाल्याने ही पाइपलाइन सध्या ठिकठिकाणी गंजलेल्या स्थितीत व अनेक ठिकाणी पाण्याची गळती होते. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार शासन दरबारी आपली कैफियत मांडली. मात्र त्याकडे दुर्लक्षच केले गेले. गावापासून सुमारे ४ ते ५ किमी अंतरावरील ओढ्याजवळील विहिरीतील पाणी पाइपलाइनद्वारे वाडीतील साठवण टाकीत सोडले जाते. मात्र गंजलेली पाइपलाइन व अनेक ठिकाणी गळती असलेल्या या साठवण टाकीमुळे पाणी वाया जात असून ग्रामस्थांच्या वाट्याला दिवसाला फक्‍त दोन ते तीन हंडे इतकेच पाणी उपलब्ध होत आहे.

Web Title: Ratnagiri News water scarcity in Uchagaon