लोटे औद्योगिक वसाहत करतेय पाणी पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

चिपळूण - लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये गेले महिनाभर वीज आणि पाणी पुरवठ्यामध्ये अनियमितता आहे. गेले ३६ तास लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

चिपळूण - लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये गेले महिनाभर वीज आणि पाणी पुरवठ्यामध्ये अनियमितता आहे. गेले ३६ तास लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळच्या वालोपे येथील पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू आहे. वालोपे पंपहाउसमधील फ्लो मीटरच्या प्लॅजचे गॅसकिट लिक झाल्याने पाणीपुरवठा बंद झाला होता. 

लोटे परशुराममध्ये रासायनिक कंपन्या असल्यामुळे त्यांना पाणी मोठ्या प्रमाणावर लागते. प्रत्येक उद्योजकाने २४ तास पुरेल इतका पाण्याचा साठा केलेला असतो. परंतु गेले महिनाभर पाणी पुरवठ्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळच्या कारभाराबाबत उद्योजकांमध्ये संताप आहे. नोव्हेंबरमध्ये ३० तास डिसेंबरमध्ये १२० तास आणि जानेवारी महिन्यात १२५ तास पाणीपुरवठा खंडित झाला होता.

रत्नागिरी येथे मंगळवारी सभा 
उद्योजक संघटनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी पाणी व वीजपुरवठा होत नसल्याने आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी २७ मार्चला उद्योजक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र विद्युत नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांची सभा रत्नागिरी येथे आयोजित केली आहे.

\गेले महिनाभर दर २४ तासांनी ८ तास पाणीपुरवठा बंद असतो. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे. वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर पाइपलाइन फुटते, पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम झाल्यावर भरतीच्या काळात ४ तास पंपिंग करता येत नाही. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पुरेशी साठवणूक क्षमता नसल्यामुळे, उद्योजकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
उद्योजकांच्या या समस्येबाबत प्रशासनात असलेली उदासीनता, वारंवार खंडित होणारा वीज आणि पाणीपुरवठा यामुळे उद्योजक हैराण झाले आहेत. शासनाने या विषयाकडे गांभीर्यान बघावे आणि प्रश्न मार्गी लावावेत, अशी उद्योजकांची अपेक्षा आहे. लोटे परशुरामच्या वीज आणि पाणीपुरवठ्याबाबत उद्योजकांत तीव्र संताप आहे.

  •  रासायनिक कारखान्यांना फुटला घाम
  •  वीजपुरवठ्याचाही खेळखंडोबा
  •  उद्योजक आंदोलनाच्या तयारीत

जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे उद्योजक संघटना शांत बसली आहे. अन्यथा रास्ता रोकोसह आंदोलन करण्याचा उद्योजकांनी पावित्रा घेतलेला होता. सुरळीत आणि स्वच्छ पाणी व वीजपुरवठा होईल अशी उद्योजकांना अपेक्षा आहे.

उद्योजक एमआयडीसीवर नाराज

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पाणीपुरवठ्याच्या देखभाल व दुरुस्तीबाबत गंभीर नाही. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पुरवठा होत असलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असते. दोन दिवसांपूर्वी लोटे पंप हाउसमधील सिटीबिटी खराब झाल्याने पाणीपुरवठा बंद होता. सिटीबिटी खराब होण्याची गेल्या सहा महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पुरवठा होणाऱ्या साहित्याच्या दर्जाची चौकशी होण्याची गरज आहे, अशी मागणी लोटे औद्योगिक वसाहतीच्या वतीने अध्यक्ष प्रशांत पटवर्धन यांनी केली आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीचा पाणीपुरवठा ३६ तास बंद आहे. याबाबत बोलताना त्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीला ३० वर्षे झाली. वालोपे चिपळूण येथून होणारा पाणीपुरवठा हा ज्या पाइपलाइनमधून केला जातो ती पाइपलाइन जुनी झाली असल्यामुळे ती वारंवार फुटते. ही पाइपलाइन नव्याने टाकावी, अशी मागणी संघटनेने केली व त्याचा पाठपुरावा केला. मुख्यालयाकडून हा प्रस्ताव मंजूर करुन आणला. परंतु अद्याप महामंडळाने हे काम पूर्ण केलेले नाही. महामंडळाकडून पाणीपुरवठा व्यवस्थापनही नीट केले जात नाही. पाणीपुरवठा अखंड होत नाही, असे पटवर्धन यांनी सांगितले.

परराज्यात वीज स्वस्त असल्यामुळे अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत. कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या उद्योजकांना कर्नाटक सरकारने चांगल्या सोयीसुविधा दिल्या आणि बरेचसे उद्योग कर्नाटकात नेले. गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर उद्योग स्थलांतरित होत आहेत, याकडेही त्यांनी निर्देश केला.

Web Title: Ratnagiri News water scarity in Lote Industrial estate