२५ तारखेपासून वॉटर स्पोर्ट बंद करण्याचा निर्णय

राजेश शेळके
सोमवार, 7 मे 2018

रत्नागिरी - पर्यटकांसाठी समुद्रीसफरीतील पर्वणी ‘वॉटर स्पोर्ट’चे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. सुटीचा हंगाम असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्यात दाखल आहेत. समुद्राच्या आकर्षणामुळे जिल्ह्यातील सर्व किनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. मात्र, लहरी हवामानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मेरिटाईम बोर्डाने येत्या २५ तारखेपासून वॉटर स्पोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्याला लाभलेले विस्तीर्ण समुद्र किनारे पर्यटकांना खुणावतात. मात्र, अजूनही मूलभूत सोयीसुविधांअभावी त्यांचा विकास झालेला नाही. ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि मेरिटाईम बोर्डाने त्याला चालना देण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने काही ठिकाणी कार्यवाही सुरू झाली. पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आदी भागातील पर्यटकांना समुद्राचे मोठे आकर्षण आहे. त्यामुळे मे महिन्याच्या सुटीमध्ये हजारोंच्या संख्येने पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होतात.

तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे, समुद्रकिनारा पाहिल्यानंतर पर्यटक थांबावेत यासाठी गणपतीपुळे, आरे-वारे, मुरूड, आंजर्ले, गुहागर आदी भागात बीचवर योग्य ते शुल्क भरून मेरिटाईम बोर्डाच्या परवानगीने हे सागरी खेळ सुरू आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ऐन सुटीच्या हंगामात हे वॉटर स्पोर्ट बंद करण्याचा निर्णय मेरिटाईम बोर्डाने घेतला आहे. मे महिन्याच्या अखेरीस मॉन्सूनची चाहूल लागण्यास सुरुवात होते.

वातावरणामध्ये बदल होऊन समुद्राला कधीही उधाण येऊ शकते. त्यामुळे येत्या २५ तारखेपासून जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट बंद करण्याचे आदेश मेरिटाईम बोर्डाने दिले आहेत. पर्यटकांचा काहीसा हिरमोड होण्याची शक्‍यता आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील गणपतीपुळे, मुरूड आदी भागातील वॉटर स्पोर्ट २५ तारखेपासून बंदचे आदेश दिले आहेत. 
- कॅ. संजय उगलमोगले,

मेरिटाईम बोर्ड अधिकारी, रत्नागिरी

Web Title: Ratnagiri News water sport issue