#MonsoonTourism कोकणात घाटातील धबधबे प्रवाहित

#MonsoonTourism कोकणात घाटातील धबधबे प्रवाहित

संगमेश्वर - पावसाळी सहलीसाठी कोकण हे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. सध्या कोकणच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढला असल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील प्रसिद्ध धबधबे प्रवाही झाले असून हा अप्रतिम नजारा पर्यटकांना खुणावू लागला आहे . याच बरोबर कुभार्ली, आंबा आणि अंबोली हे घाटरस्ते दाट धुक्याने व्यापले जात असल्याने हे चिंब घाट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होवू लागली आहे . मात्र पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटताना सदैव सतर्क राहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

कशेडी घाट उतरतानाच कोकणच्या पावसाळ्यातील अद्भूत सौंदर्याची प्रचिती येऊ लागते. डोंगर दऱ्यातून प्रवाहीत झालेले लहानमोठे धबधबे , डोंगरांना टक्कर देणारे दाट धुक्यांचे ढग आणि यामुळे निर्माण होणारे आल्हाददायक वातावरण सारेच पर्यटकांना सुखावणारे आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात अनेक प्रसिध्द धबधबे असले तरी, आडवाटेवर असणारे आणि फारसे कोणाला माहिती नसणारे काही धबधबे प्रसिध्दीच्या झोतात येणे आवश्यक आहे.

धबधब्यांची उंची आणि पाण्याच्या प्रवाहाचा जोर पाहून पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेणेही महत्वाचे आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणची दृष्ये छायाबध्द करण्यासारखी असली तरी मोबाईल वरुन सेल्फी काढतांना सतर्क असणे महत्वाचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने समुद्र किनारी तसेच महत्वाच्या धबधब्यांवर सध्या सुरक्षारक्षक नियुक्त केले असून त्यांच्या सूचनांचे अवलंबन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

उंचावरून कोसळणारे धबधबे, ओले चिंब होण्यासाठी आकर्षित करतात. धबधबा जेवढा उंच तेवढा तो नयनरम्य भासतो खरा, पण अशा उंच धबधब्याखाली भिजायला जाणं धोकादायकही असतं. धबधब्याचा प्रवास खूप दूरवरून होत असतो. प्रत्यक्ष धबधब्याजवळ जरी नसला तरी, त्याच्या उगमस्थानाजवळ आणि प्रवाहाच्या परिसरात जोरदार पाऊस झाला की, अनपेक्षितपणे पाण्याची पातळी वाढते आणि दुर्दैवी घटना घडू शकते. कोकणात ठिकठिकाणी पूर्वी अशा घटना घडल्या आहेत. याची जाणीव ठेवूनच धबधब्यांच्या किती जवळ जायचं, हे ठरवणं महत्त्वाचं ठरतं. सद्यस्थितीमध्ये कोकणात ठिकठिकाणी जमीन खचण्याचं आणि दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलं आहे. घाटरस्त्यांवरून प्रवास करताना अथवा उंच धबधब्यांजवळ जाताना निसर्गाच्या अपूर्वाईचा आनंद विसरायला लावतो, हे जरी खरं असलं तरी सतर्क राहणं तितकंच महत्त्वाचं आहे.

पावसाळी पर्यटनात ग्रामीण कृषी पर्यटनाचे महत्व वाढत असून ग्रामीण भागात जावून निवास करणे, तेथील प्रसिद्ध भोजनाची लज्जत चाखणे तसेच शेतावर जावून प्रत्यक्ष लावणी लावण्यात सहभाग घेणे, चिखलात फिरुन मातीच्या स्पर्शाची अनुभूती घेणे याकडे सध्या पर्यटकांचा ओढा वाढला असून कोकणच्या दोन्ही जिल्ह्यात ग्रामीण कृषी पर्यटनावर अनेक शेतकरी आणि व्यावसायिकांनी भर दिला आहे . गत आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला असल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात लावणीच्या कामांनी वेग घेतला आहे. लावणी हंगामाला हळूहळू सुरुवात झाल्याने कोकणातील पावसाळी पर्यटनाला आता जोर चढणार आहे. राज्याच्या विविध भागातून कोकणच्या निसर्गसौंदर्याची जादू पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी कोकण सज्ज झाले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com