वन्यजीवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

संदेश सप्रे
सोमवार, 25 जून 2018

संगमेश्वर - सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई व आयसीआयसीआय बँक यांच्यातर्फे २६ व २७ जून रोजी विद्यार्थ्यांनी काढलेल्या वन्यजीवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन ब्राम्हण सहाय्यक संघ सभागृह, चिपळूण येथे होणार आहे.

संगमेश्वर - सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई व आयसीआयसीआय बँक यांच्यातर्फे २६ व २७ जून रोजी विद्यार्थ्यांनी काढलेल्या वन्यजीवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन ब्राम्हण सहाय्यक संघ सभागृह, चिपळूण येथे होणार आहे.

ही छायाचित्रे सात जिल्ह्यातील २०० मुलांनी काढलेले असून चिपळूणकरांना पहावयाची संधी लाभणार आहे. हिंदूस्थान हा एक जगातील आठ जैवविविधतापूर्ण स्थळांपैकी एक आहे आणि हिंदूस्थानातील सह्याद्रीचा भाग जैवविविधता संपन्न आहे. या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांच्या सोबतीने आणि आयसीआयसीआय बँक यांच्या सहकार्याने ई- मॅमल हा प्रकल्प सात जिल्ह्यातील २० शाळांत राबवला जातोय.

ई- मॅमल हा प्रकल्प १७ देशांत राबविण्यात येत असून हा हिंदूस्थानात पहिल्यांदाच राबवून वन्यजीवाबाबत माहित मिळवण्याचे काम चालू आहे. सदर प्रकल्पामध्ये प्रत्येक शाळेतील ८ वी व ९ वी चे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. प्रकल्पात सहभागी प्रत्येक शाळेला ३ ट्रॅप कॅमेरे, लॅपटॉप, प्रोजेक्टर, प्रिंटर इंटरनेट, दुर्बीण, बॅटरी आणि मेमरी कार्ड्स आणि माहितीपत्रिका प्रदान केले आहेत. विद्यार्थी ५ ते १० चा गट तयार करून कॅमेरे शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात बसवतात आणि त्यामध्ये आलेले फोटो विद्यार्थी स्वतः ई- मॅमल वेबसाईटवर अपलोड करतात.

गेले वर्षभर हे विद्यार्थी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापूर, ठाणे आणि पालघरमध्ये आपल्या गावात हे कॅमेरे बसवून त्यात येणाऱ्या फोटोंचा अभ्यास करत आहेत.ही सर्व माहिती संशोधनासाठी वापरली जाते त्यामुळे अनेक संशोधाकांचा बराच पैसा आणि वेळ वाचतो आहे. आतापर्यंत कॅमेऱ्या मध्ये पट्टेरी वाघ, अस्वल आणि बिबट्या तसेच दुर्मिळ व नष्ट होण्याच्या मार्गावर असणारे खवले मांजर त्याचप्रमाणे साळींदर आणि सहज आढळणारे भेकर, सांबर, रानडुक्कर, रानटी ससे, काळमांजर, मुंगुस व माकडे आदि वन्यप्राणी टिपले गेले आहेत..

या प्रकल्पाचाच एक भाग म्हणून वन्यजीवांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रकांत इंगोले (सामाजिक वित्त विभाग आयसीआयसीआय बँक) यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राहुल खोत (क्युरेटर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई) व भाऊ काटदरे (अध्यक्ष सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण) हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये आपल्या कॅमेऱ्या मध्ये टिपलेल्या सस्तन प्राण्यांचे छायाचित्र लावण्यात येणार आहेत व त्याबाबत प्रकल्पातील सहभागी विद्यार्थी माहिती सांगणार आहेत. या वन्यजीवांच्या छायाचित्र प्रदर्शनात सहभागी होऊन वन्यजीवांचे छायाचित्र पाहून शास्त्रीय माहिती मिळवण्याची संधी सह्याद्री निसर्ग मित्रने विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे.२७ जून रोजी ब्राम्हण सहाय्यक संघ सभागृह येथे हे प्रदर्शन सर्वांसाठी १० ते ४ या वेळेत सर्वांसाठी मोफत खुले राहील.

ई-मॅमल अ सिटीझन सायन्स प्रोजेक्ट

  • सात जिल्हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, सातारा आणि कोल्हापूर
  • २० शाळा २००० विद्यार्थ्यांसमवेत प्रकल्पात सहभागी
  • २०० फोटोंचे प्रदर्शन
  • विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी
  • आपल्या सभोवताली वावरणाऱ्या प्राण्यांचे फोटो पाहण्याची संधी
  • २७ जून २०१८ रोजी १० ते ४ या वेळेत सर्वांसाठी मोफत खुले.

शास्त्रज्ञाना सुद्धा प्रचंड मेहनत करून हे फोटो मिळवावे लागतात ते काम विद्यार्थ्यांनी केले ते पाहण्याची सुवर्ण संधी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांनी केले आहे.

Web Title: Ratnagiri News wildlife photography exhibition