‘जलस्वराज्य 2’ मध्ये समाविष्ट प्रकल्पांची जागतिक बँकेच्या पथकाकडून पाहणी

राजेश कळंबटे
बुधवार, 14 मार्च 2018

रत्नागिरी - ‘जलस्वराज्य 2’ मध्ये समाविष्ट असलेल्या प्रकल्पांची जागतिक बँकेच्या पथकाने पाहणी करत सद्यःस्थितीचा आढावा घेतला. असुर्डे-साखळकोंड (संगमेश्‍वर) येथे उभारलेल्या मेटॅलिक झिंग टाकी (साठवण टाकी) आणि बेलारी (संगमेश्‍वर) येथील कळंबटवाडीतील पाऊस-पाणी संकलन टाकीच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

रत्नागिरी - ‘जलस्वराज्य 2’ मध्ये समाविष्ट असलेल्या प्रकल्पांची जागतिक बँकेच्या पथकाने पाहणी करत सद्यःस्थितीचा आढावा घेतला. असुर्डे-साखळकोंड (संगमेश्‍वर) येथे उभारलेल्या मेटॅलिक झिंग टाकी (साठवण टाकी) आणि बेलारी (संगमेश्‍वर) येथील कळंबटवाडीतील पाऊस-पाणी संकलन टाकीच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

जागतिक बँकेच्या पथकाने जिल्ह्यातील ‘जलस्वराज्य-2’ कार्यक्रमांतर्गत समाविष्ट असलेल्या घटकामधील निमशहरी गावे आणि टंचाईग्रस्त वाड्या यांची आढावा बैठक घेतली. ही बैठक जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा उपस्थित होते. जागतिक चमूमध्ये श्रीमती लुसी टेरन, शिवांगी पांडे, श्री. मूर्ती, श्री. सत्यनारायण, सुधारणा सहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. दिलीप देशमुख, वरिष्ठ जल भू-वैज्ञानिक राहुल ब्राह्मणकर, अभियांत्रिकी तज्ज्ञ अजय राऊत, समाज व्यवस्थापन तज्ज्ञ मंगेश भालेराव उपस्थित होते.

सभेवेळी जागतिक बँकेच्या चमूने बैठकीला आलेल्या ग्रामपंचायतीमधील सरपंच, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सचिव, महिला विकास समिती अध्यक्ष, सचिव, लेखापरीक्षण समितीचे अध्यक्ष, सचिव व ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सद्यःस्थितीत झालेल्या कामांचा आढावा घेतला.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आर. एस. अहिरे यांनी प्रास्ताविक केले. असुर्डे-साखळकोंड येथे ग्रॅव्हिटीने पाणी टाकीत आणण्यात आले आहे. वस्तीपासून काही अंतरावर असलेल्या झर्‍यावरून हे पाणी पाइपद्वारे टाकीत संकलित केले जाणार आहे. त्याचा वापर मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यातील टंचाई कालावधीत होणार आहे. पावणेचारशे लोकांसाठी ही योजना आहे. प्रतिमाणसी वीस लिटरप्रमाणे नव्वद दिवस टंचाई काळात पाणी वापरा येईल. यासाठी 7 लाख लिटर पाणी साठविता येईल अशी टाकी उभारली आहे. त्यावर 44 लाख 66 हजार रुपये खर्च केला आहे. कळंबटवाडीतील योजना 12 लाख 39 हजार रुपयांची आहे. त्याचा फायदा 70 लोकांना मिळणार आहे. पावसाचे पाणी साठविण्यात  येणार आहे. एक लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात आली आहे.

दोन्ही प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर जागतिक बँकेच्या अधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले. पाण्याचा अपव्यय टाळावा अशी सूचना अधिकार्‍यांनी ग्रामस्थांना केली आहे. पुढील तीस वर्षे ही योजना कार्यान्वित राहील अशी देखभाल दुरुस्ती ग्रामस्थांनी केली पाहिजे. त्यासाठी महिला बचत गटांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे त्या अधिकार्‍यांनी सांगितले.

चौदा ग्रामपंचायतींचा समावेश

‘जलस्वराज्य-2’ प्रकल्प राज्यातील बारा जिल्ह्यांत राबविल्या जात आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायती या निमशहरी, तर आठ ग्रामपंचायतीमधील 14 वाड्या ग्रामीण भागात मोडतात. त्यामध्ये हा प्रकल्प राबविला जात आहे. मागील तीन वर्षात टंचाईची स्थिती लक्षात घेऊन या गावांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Ratnagiri News world bank visit to Jayswaraj project