खवले मांजराची शिकार, तस्करी रोखण्यात यश

मुझफ्फर खान
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

चिपळूण - इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या रेड डाटा बुक नुसार नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या यादीत खवले मांजराचा समावेश केला आहे. खवले मांजरापासून मानवाला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. परंतु माणूसच या प्राण्याचा मुख्य शत्रू बनला आहे. त्याचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी वन विभागाने पुढाकार घेऊन कृती आराखडा तयार केला. त्यामुळे दोन वर्षात या प्राण्याची तस्करी आणि शिकारीचे प्रमाण घटले आहे.

चिपळूण - इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या रेड डाटा बुक नुसार नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या यादीत खवले मांजराचा समावेश केला आहे.

खवले मांजरापासून मानवाला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. परंतु माणूसच या प्राण्याचा मुख्य शत्रू बनला आहे. त्याचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी वन विभागाने पुढाकार घेऊन कृती आराखडा तयार केला. त्यामुळे दोन वर्षात या प्राण्याची तस्करी आणि शिकारीचे प्रमाण घटले आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी जागतिक खवले मांजर दिन साजरा करण्यात येतो. 

दात नसल्यामुळे ते खाण्यासाठी १० ते १२ इंच लांब जिभेचा उपयोग हे मांजर करते. खवले मांजर वर्षभरात ७० ते ८० कोटी किडे खाते आणि निसर्गचक्राचा तोल सांभाळते

- विकास जगताप, विभागीय वनाधिकारी

विभागीय वनाधिकारी विकास जगताप म्हणाले, ‘‘दोन वर्षांपूर्वी पोलिस आणि वन विभागाने खवले मांजराच्या तस्करी आणि शिकारीचे प्रकार उघडकीस केले होते. त्यानंतर वन विभागाने सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या मदतीने जिल्ह्याचा सर्व्हे केला. जिल्ह्यात या प्राण्याचे वास्तव्य कुठे आहे हे निश्‍चित झाल्यानंतर खवले मांजर संरक्षण व संवर्धनासाठी कृती आराखडा तयार केला. वन विभागाने आपले कर्मचारी, पोलिस, ग्रामपंचायत, पोलिसपाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांच्यामध्ये जनजागृती केली. जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यशाळा झाली. आदिवासी समाजातील लोकांकडून खवले मांजराची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. ती रोखण्यासाठी जिल्ह्यात आदिवासी समाजासाठी स्वतंत्र कार्यशाळा झाल्या. यातून शिकार आणि तस्करीसाठी असलेल्या कायद्याची माहिती दिली. त्यामुळे मागील दोन वर्षात खवले मांजराच्या शिकार किंवा तस्करीची एकही घटना घडली नाही..’’

संरक्षणासाठी अजब युक्ती
भारतीय खवले मांजराची लांबी (डोके व धड) ६०-७५ सेंटीमीटर असते. शेपूट ४५ सेंटीमीटर लांब असते. डोके लहान, तोंड लांबट व पुढे निमुळते असते. डोळे बारीक व कान फार लहान असतात. साधारणत: ८ ते ३५ किलोपर्यंत वाढते. त्याच्या अंगावर असलेले खवले हे किराटीन नामक द्रव्यापासून तयार होतात. पाय, पोट, कपाळ असा काही भाग सोडल्यास संपूर्ण अंगभर हे खवले असतात. धोक्‍याची जाणीव होताच खवले मांजर स्वत:च्या शरीराचा गोल भाग करून घेते. यामुळे त्याचे शत्रूपासून संरक्षण होते.

Web Title: Ratnagiri News World Pale Cat Day special