झाशीच्या राणीचे सासर कोट येथे होणार स्मारक

मकरंद पटवर्धन
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अजरामर झालेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे त्यांच्या सासरी कोट (ता. लांजा) येथे स्मारक उभारण्यात येणार आहे. दीड एकरवर पाच कोटी रुपये खर्चून, जांभ्या चिऱ्यामध्ये भव्य व प्रेरणादायी असे हे स्मारक साकारणार आहे.

रत्नागिरी - १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात असामान्य पराक्रम गाजवणाऱ्या, ‘मेरी झांसी नहीं दूंगी’ असे इंग्रजांना ठणकावून सांगत भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अजरामर झालेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे त्यांच्या सासरी कोट (ता. लांजा) येथे स्मारक उभारण्यात येणार आहे. दीड एकरवर पाच कोटी रुपये खर्चून, जांभ्या चिऱ्यामध्ये भव्य व प्रेरणादायी असे हे स्मारक साकारणार आहे.

२०१३ मध्ये तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी स्मारकाची घोषणा केली. सध्या त्याचा आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे. दोन वर्षांत हे स्मारक पूर्णत्वास जाईल, अशी माहिती राजू नेवाळकर यांनी ‘सकाळ’ला दिली. 

राणी लक्ष्मीबाईंची आज १८२ वी जयंती आहे. गेली पाच वर्षे येथे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. स्मारकामध्ये झाशीच्या राणीचा अश्‍वारूढ पुतळा, बहुद्देशीय सभागृह, महिलांसाठी कक्ष, उद्यान, योगसाधना केंद्र, पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, जुन्या वस्तूंचे संग्रहालय यांचा समावेश आहे. पर्यटकांसाठी मूलभूत सुविधाही देण्यात येतील. आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच तो पूर्ण होईल. पुढील दोन-तीन वर्षांत स्मारकाचे कामही मार्गी लागेल.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे दिवंगत अध्यक्ष भाऊसाहेब नेवाळकर हेसुद्धा कोट येथील. त्यांनी १९९८ मध्ये येथे नेवाळकरांचे संमेलन घेतले होते. राणीचे स्मारक भव्य-दिव्य व्हावे याकरिता सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही. २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. त्यानंतर सूत्रे फिरली व एमटीडीसीचे अधिकारी कोट येथे दाखल झाले. पर्यटन केंद्र म्हणून गावाची नोंद झाल्याने रस्ते व अन्य कामे झाली. अजूनही अनेक कामे आहेत. राणी लक्ष्मीबाईंनी पाली येथील पल्लीनाथ मंदिराला वार्षिक तनखा चालू केला. पल्लीनाथासाठी सोन्याचा किरिट दिला. पेठकिल्ला येथील भगवती मंदिरासही राणीने भेट दिली होती, असे इतिहास सांगतो. 

ब्रिटिशांकडूनही गौरव
चिमाजी आप्पांचे व्यवस्थापक मोरोपंत तांबे व भागीरथीबाई यांच्या पोटी १९ नोव्हेंबर १८३५ ला राणी लक्ष्मीबाईंचा जन्म झाला. त्यांचे माहेरचे नाव मनुताई. बाजीराव पेशव्यांमुळे ब्रह्मावर्त येथील वाड्यात नानासाहेब पेशवे व रावसाहेब यांच्यासह मनुताईने तलवार, दांडपट्टा व बंदूक चालवणे तसेच घोडदौडीचे शिक्षण घेतले. सातव्या वर्षी तिचे लग्न मूळ कोट येथील व झाशी संस्थानचे अधिपती गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाले. ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईंचा उल्लेख हिंदुस्थानची ‘जोन ऑफ आर्क’ असा केला. या राणीवर अनेक काव्ये, पोवाडे रचले गेले. मध्यप्रदेश सरकार वीरता दाखविणाऱ्या स्त्रीला ‘वीरांगना लक्ष्मीबाई राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करते.

Web Title: Ratnagiri News Zashichi Rani Laxmi Bai birth anniversary special