esakal | रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट; एनडीआरएफची चार पथके दाखल; साडेपाच हजार लोकांचे होणार स्थलांतर
sakal

बोलून बातमी शोधा

rain

रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट; एनडीआरएफची चार पथके दाखल; साडेपाच हजार लोकांचे होणार स्थलांतर

sakal_logo
By
राजेश कळंबटे/

रत्नागिरी: जिल्हयात 11 व 12 जूनला अति मुसळधार पावसाची शक्यता असून पूरस्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज झाले आहे. एनडीआरएफची चार पथके दाखल झाली असून साडेपाच हजार लोकांच्या स्थलांतराची व्यवस्था केली आहे. समुद्र, खाडी, नदी किनार्‍यावरील पूरग्रस्त, दरडग्रस्त भागात प्रवासासाठी प्रतिबंध घालण्यात आले आहेत. ratnagiri-orange-alert-four-squads-of-ndrf-filed-in-ratnagiri-konkan-cyclone-marathi-news

हवामान विभागाकडून जिल्ह्यात 11 ते 12 जूनसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. या कालावधीत अति मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने गेले दोन दिवस आपत्कालासाठी तयारी केली आहे. यासंदर्भात तहसील प्रशासनाला आदेशही काढले आहेत. त्यानुसार समुद्र, खाडी व नदी किनार्‍यावरील गावांसह चिपळूण, खेड व राजापूर पालिका परिसरात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. दरड कोसळण्याचीही शक्यता आहे. जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी पूरग्रस्त व दरडग्रस्त परिसरात पुढील दोन दिवस जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. जिल्ह्यात पुरग्रस्त 31 आणि दरडग्रस्त 45 ठिकाणे आहेत. धोकादायक ठरणार्‍या ठिकाणांवर 5 हजार 500 कुटूंबे असून आवश्यकता भासल्यास त्यांचे स्थलांतर करण्याची तयारी केली आहे.

पुर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफची (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक) चार पथके जिल्ह्यात दाखल झाली आहेत. त्यातील वीस जणांचे एक पथक रत्नागिरीत आहे. शुक्रवारी (ता. 11) संभाव्य ठिकाणाची पाहणी करतील. पूर परिस्थितिसाठी अतिसंवेदनशील असलेल्या चिपळूण, खेडसह राजापूरला तिन पथके रवाना झाली आहे. प्रत्येक पथकाकडे तिन फायबर बोटी असून अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध आहे. रत्नागिरी तालुक्यात सोमेश्‍वर, हरचिरी चांदेराई, टेंभ्ये यासह खाडी किनार्‍यांवरील 56 गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. सोमेश्‍वर येथे फायबर बोट आणि बोये सज्ज ठेवले आहेत. काजळी नदी किनार्‍यावरील चांदेराई बाजारपेठेतील 8 दुकानांना स्थलांतराच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी शहरातील झाडगाव किनार्‍यांवरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दुपारनंतर पावसाची विश्रांती

गुरुवारी (ता. 10) सकाळी संततधार पाऊस झाला; मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली. जिल्ह्यात मागील चोविस तासात सरासरी 21.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड 22, दापोली 31.10, खेड 42.80, गुहागर 12.60, चिपळूण 3.70, संगमेश्वर 19.30, रत्नागिरी 32, राजापूर 13.50, लांजा 14.70 मिमी पाऊस झाला.

हवामान विभागाकडून येणार्‍या अंदाजानुसार कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय होईल. सध्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

- दत्ता भडकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी