रत्नागिरीत मतदानाचा टक्‍का घसरला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

रत्नागिरी - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी रत्नागिरी तालुक्‍यात ६३.४० टक्‍के मतदान झाले. एकूण १,८६,४४० पैकी १,१८,२१० मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. मागील निवडणुकीपेक्षा यावर्षी कमी मतदानाची नोंद झाली आहे. मागीलवेळी ७७ टक्‍के मतदान झाले होते. यावेळी चौदा टक्‍क्‍यांनी मतदान घसरल्याने एवढा मोठा फटका कोणत्या पक्षाला बसणार याचीच चर्चा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान कमी झाल्याने राजकीय पक्षही चिंतेत आहेत.

तालुक्‍यात १० गटांसाठी ४२ आणि २० गणांसाठी ६६ उमेदवार रिंगणात आहेत. २५४ मतदान केंद्रांवर काल (ता. २१) शांततेत मतदान झाले. शिवसेना, भाजप आमने-सामने लढत आहेत. काँग्रेसने राष्ट्रवादी आणि बविआशी आघाडी केली. रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. भाजपने हातपाय पसरण्यास सुरवात केली आहे. त्यात तो पक्ष काहीअंशी यशस्वी झाला. मतदानाच्या दिवशी शिवसेनेच्या प्रत्येक मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती. भाजपच्या काही मोजक्‍या ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येता होता. तालुक्‍यातील राजकीय स्थिती लक्षात घेता पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा कायम राहील, असाच अंदाज गुप्तचर यंत्रणांनी वर्तविला आहे. तसेच गटांच्या दहा जागांमध्ये ७० टक्‍के जागा सेनेला काबीज करता येतील, असा विश्‍वास आहे. राजकीय पक्षांचे नेते आज दिवसभर अंदाज घेण्यात गर्क आहेत.

मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती. त्यावेळी आमदार उदय सामंत हे राष्ट्रवादीत होते. २०१२ ला झालेल्या निवडणुकीत ७७.२८ टक्‍के मतदान झाले होते; मात्र यावर्षी हा टक्‍का घसरला. सर्वात कमी मतदान हरचिरी गणात ५४ टक्‍के, तर सर्वाधिक मतदान ६८ टक्‍के फणसवळे आणि हातखंबा गणात झाले. या निवडणुकीत शिवसेनेकडून सर्वाधिक जागा मिळतील, असा दावा तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी केला आहे. बालेकिल्ल्याला भगदाड पाडल्याचे भाजप, राष्ट्रवादीकडूनही सांगितले जात आहे.

Web Title: Ratnagiri percent down vote