
रत्नागिरी : सत्ताधारी विरुद्ध संस्था पॅनेलमध्ये चुरस
रत्नागिरी: रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज चुरशीने मतदान झाले. एकूण ३७ जागांसाठी दोन पॅनेलचे मिळून ६६ उमेदवार आमने, सामने होते. सकाळी १०. ३० ते सायंकाळी ५. ३० या वेळेत मतदान झाले. सत्ताधारी अरुअप्पा तथा नृसिंह पॅनेल विरुद्ध संस्था पॅनेल यांच्यात स्पर्धा पाहायला मिळाली. दिवसभरात सुमारे १०७३ मतदारांपैकी ६७३ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (ता. १६) सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार असून दुपारी तीनच्या दरम्यान संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
निवडणूक अध्यक्ष, उपाध्यक्ष ३ जागा, कार्यवाह १, सहकार्यवाह १, विश्वस्त ३ जागा, सल्लागार मंडळ १० जागा, नियामक मंडळ १८ जागा अशा ३७ जागांसाठी घेण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, सहकार्यवाह, सल्लागार, नियामक मंडळ सदस्य, विश्वस्त आदींसाठी एकूण ७ मतपत्रिका ठेवल्या होत्या. कॉमर्स बिल्डिंगमध्ये दोन मतदान केंद्रे ठेवण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग ठेवून त्यांना मतदानासाठी प्राधान्य देण्यात आले. या निवडणुकीत नव्याने केलेल्या १९८ सदस्यांना मतदारांनी हक्क बजावला. दरम्यान, आज सकाळी संस्थेची वार्षिक सभा सुरू झाली, ती तहकूब करून मतदान प्रक्रिया घेण्यात आली. उद्या निकालानंतर सायंकाळी ५ वाजता तहकूब सभा पुन्हा सुरू होईल व त्यामध्ये निकाल जाहीर केला जाईल.
सत्ताधाऱ्यांचे मताधिक्य वाढणार..
विद्यमान सत्ताधाऱ्यांनी केलेले हे सदस्य बेकायदेशीर असल्याबद्दल न्यायालयात रमेश कीर व सहकाऱ्यांनी दाद मागितली होती. परंतू, सत्ताधाऱ्यांच्या बाजूने निकाल लागल्यामुळे या मतदारांना आज मतदान करता आले. या मतदारांमुळे सत्ताधाऱ्यांचे मताधिक्य वाढणार आहे. शिवाय अंतर्गत विरोधी प्रवाहांमुळे मतदान करताना काही जागांसाठी चुरशीने मतदान करण्यात आले. काही ठिकाणी क्रॉस व्होटिंग झाल्याचा अंदाज काही आज पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
अध्यक्ष, कार्यवाहसाठी अटीतटीची लढत
अध्यक्षपदासाठी केंद्रीय मंत्री, गोव्याचे खासदार श्रीपादभाऊ नाईक विरुद्ध ज्येष्ठ करसल्लागार अॅड. श्रीकांत वैद्य यांच्यात लढत झाली. तसेच कार्यवाह पदासाठी विद्यमान कार्यवाह सतीश शेवडे आणि माजी कार्यवाह प्रा. माधव पालकर यांच्यात लढत झाली. या दोन्ही पदांसाठी अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत. सोमवारी निकालानंतर कोण जिंकते, हे कळणार आहे.
निकालाकडे साऱ्यांचे लक्ष
शिक्षणमहर्षी (कै.) बाबुराव जोशी, (कै.) मालतीबाई जोशी यांनी स्थापन केलेल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीला मोठा शैक्षणिक परंपरा आहे. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयासह कनिष्ठ महाविद्यालय विधी महाविद्यालय, प्राथमिक, माध्यमिक शाळा, संगणक शिक्षण देणाऱ्या घटकसंस्था आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सकाळी ८ वाजता मतमोजणी
आज मतदान प्रक्रियेत ६० प्राध्यापक, केंद्राध्यक्ष, सहकेंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामकाजात भाग घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. मकरंद साखळकर काम पाहत आहेत. उद्या सकाळी ८ वाजता संस्थेच्या सभागृहात मतमोजणीला सुरवात होणार आहे. दुपारी अडीच ते तीन वाजेपर्यंत निकाल हाती येईल.