esakal | राजापूर अर्बन बॅंकेवर सायबर हल्ला़;  67 लाख लुटण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

ratnagiri rajapur urban bank cyber attack 67 lakhs

बॅंकेने तत्काळ हॅकरने ज्या खात्यामध्ये ही रक्कम ट्रान्स्फर केली ती सर्व खाती गोठविल्याने मोठा आर्थिक धोका टळला आहे. 

राजापूर अर्बन बॅंकेवर सायबर हल्ला़;  67 लाख लुटण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर (जि. रत्नागिरी) :  लॉकडाउन आणि रविवारच्या सुट्टीचा फायदा उठवत अज्ञात हॅकरने सायबर हल्ला करून येथील राजापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेचे मोबाईल ऍप हॅक केले. राजापूर शाखेतून एका खातेदाराचे खाते हॅक करत इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने 67 लाख 22 हजार 316 रुपये रक्कम ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, बॅंकेच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न रोखण्यात यश आले.

ही बाब लक्षात येताच बॅंकेने तत्काळ हॅकरने ज्या खात्यामध्ये ही रक्कम ट्रान्स्फर केली ती सर्व खाती गोठविल्याने मोठा आर्थिक धोका टळला आहे. बॅंकेने या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर त्या खात्यातील रक्कम राजापूर अर्बन बॅंकेकडे वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी अशा प्रकारे हॅकरने चंद्रपूर येथील एका खात्यात वर्ग केलेले एक लाख 70 हजार रुपये बॅंकेकडे जमा झाले आहेत. राजापूर अर्बन बॅंकेने दाखविलेल्या या तत्परतेमुळे बॅंकेचे आर्थिक नुकसान टळले असून या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोमवारी (ता. 20) हा प्रकार घडला आहे. 

या प्रकरणी बॅंकेच्या राजापूर शाखेचे अधिकारी रमेश काळे यांनी अज्ञाताने बॅंकेवर सायबर हल्ला केल्याची फिर्याद दिली आहे. अशा प्रकारे त्या अज्ञात हॅकरने वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या बॅंकांमधील 16 खातेदारांच्या खात्यामध्ये सुमारे 67 लाख 22 हजार 316 रुपये हस्तांतर केले; मात्र यातील सुमारे 50 ते 60 लाख रुपये बॅंकेने तत्काळ सर्व खाती गोठविल्याने जमा असल्याचे बॅंकेच्या वतीने सांगण्यात आले. गुरुवारी यातील एक लाख 70 हजार रुपये एका खात्यातून राजापूर अर्बन बॅंकेकडे वर्ग झाले आहेत. 
20 एप्रिलला आमच्या बॅंकेमधील खात्यामध्ये केवळ 79 रुपये असलेल्या एका खातेदाराचे खाते हॅक केले. त्या खात्यावर कोणतीही रक्कम नसताना त्यामध्ये खोट्या व बनावट नोंदी करून हॅकरने आमच्या बॅंकेतील रक्कम इतरांच्या नावे इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीद्वारे ट्रान्स्फर केल्याचे काळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. 
याबाबत बॅंकेच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून तत्काळ माहिती दिली. त्यानंतर बॅंकेकडून आमची इंटरनेट यंत्रणा बंद करून ज्या ज्या ठिकाणी पैसे ट्रान्स्फर झालेले दिसले त्या ठिकाणी मेल करून ट्रान्स्फर झालेली रक्कम स्थगित करावी व ती हस्तांतरित करू नये, अशी विनंती केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बॅंकेचे ट्रान्स्फर झालेले बहुतांश पैसे पुन्हा बॅंकेकडे वर्ग करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. 
या प्रकरणी राजापूर पोलिसांनी अज्ञात हॅकरच्या विरोधात कलम 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 43, 66 सी व 66 ड प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 

हॅकरने विविध राज्यातील बॅंकेत पैसे केले जमा
हॅकरने विविध राज्यांमध्ये विविध बॅंकांमध्ये असलेल्या 12 खातेदारांच्या खात्यात ही रक्कम जमा केली आहे. यामध्ये नोएडा, उत्तरप्रदेश, बंगळूर, बारा खंबा (दिल्ली), ऐजवाल मिझोराम, बोहमहल्ली- कर्नाटक, इंदिरापूरम- उत्तरप्रदेश, नागालॅंड, चंद्रपूर-महाराष्ट्र, गोवा, हरियाना अशा राज्यांमध्ये असलेल्या कॅनरा बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, इंण्डसण्ड, आयसीआसीआय, युको, दी फेडरल अशा बॅंकांमध्ये खाती असलेल्या त्या 16 ग्राहकांच्या खाती ही रक्कम जमा केली. 

पैसे परत मिळण्याची प्रक्रिया सुरू : अभ्यंकर

राजापूर : बॅंकेने हॅकरकडून ज्या खात्यांमध्ये असे अबनॉर्मल इलेक्‍ट्रॉनिक व्यवहार करण्यात आले, ती खाती तत्काळ गोठवण्यात आली. या प्रकरणी तत्काळ पोलिसांकडे तक्रार करून रक्कम परत मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली. गुरुवारी यापैकी एक लाख 70 हजार रुपये जमाही झाले आहेत. त्यामुळे सायबर अटॅक झाला असला तरी बॅंकेचे पैसे सुरक्षित आहेत. ठेवीदारांच्या सर्व रकमा सुरक्षित असल्याची ग्वाही बॅंकेचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी दिली आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही या दोघांनी केले आहे. 
लॉकडाउनमधील परिस्थितीचा फायदा घेऊन हा सायबर अटॅक केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याबाबत बॅंकेने त्वरित कारवाई करून उपाययोजनाही केल्याची माहिती अभ्यंकर व अहिरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 
सायबर हल्ल्यामधून बॅंकेला कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजी आम्ही घेतली आहे. असे गैरप्रकार करणारे व त्यांना मदत करणारे यांच्यावर वचक बसावा, त्यांना शिक्षा व्हावी व यापुढे आळा बसावा, या हेतूने बॅंकेने पोलिस कारवाईची प्रक्रिया पारदर्शीपणे सुरू केल्याचे नमूद आहे. हॅकरने रक्कम जमा केलेली सर्व खाती व रक्कम आम्ही तत्काळ संपर्क साधून ब्लॉक केली. आता कायदेशीर प्रक्रियेतून ती पुन्हा बॅंकेकडे वळवण्याची प्रक्रिया हाती घेतली व त्याला यशही येत आहे. 
बॅंक ठेव विमा हप्ते नियमित भरत आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यांविरोधात सुरक्षितता वाढविण्याची प्रक्रिया तज्ज्ञ व्यक्ती व संस्थांच्या मार्गदर्शनाखाली आहे. ती अजून सक्षम करण्याची अंमलबजावणी त्वरित सुरू आहे. या घटनेमुळे बॅंकेच्या सभासद, ग्राहक, ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये. त्यांचे व्यवहार, ठेवी सुरक्षित आहेतच व यापुढेही राहतील. सभासदांनी आतापर्यंत बॅंकेवर विश्वास ठेवला, तसाच या पुढेही ठेवतील, अशी अपेक्षा दोघांनी व्यक्त केली आहे. 
बॅंकेने गेल्या आर्थिक वर्षात अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. 4 कोटी 37 लाखांचा ढोबळ व 2 कोटी 1 लाखाचा निव्वळ नफा बॅंकेने मिळविला आहे. बॅंकेचे खेळते भांडवल 270 कोटी 59 लाख इतके असून एकूण भांडवल व निधी रक्कम 17 कोटी 71 लाख इतकी आहे. बॅंकेचे निव्वळ एनपीए शून्य टक्के असून थकबाकीचे प्रमाण 1.54 टक्के इतके आहे. त्यामुळे बॅंकेची आर्थिक स्थिती उत्तम असून ग्राहकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही अभ्यंकर व अहिरे यांनी केले आहे. 

loading image
go to top