रत्नागिरी : सामंतांच्या गट बदलाचा सेनेलाच फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant

रत्नागिरी : सामंतांच्या गट बदलाचा सेनेलाच फटका

रत्नागिरी : बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या रत्नागिरी जिल्ह्यातील एक मंत्री आणि एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटाला सामील झाल्यामुळे शिवसेनेला राजकीयदृष्ट्या मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत उदय सामंत यांचे वर्चस्व राहिले असून शिवसेनेतील दुसरं नेतृत्वच निर्माण झालेले नाही. त्यामुळे स्वतंत्र गट किंवा भाजपमध्ये सामंतांनी प्रवेश केला, तरीही रत्नागिरीतील त्यांच्या वर्चस्वाला तेवढा धक्का बसेल, असे नाही. उलटपक्षी शिवसेनेचे मोठे नुकसान होणार आहे.

खेड-दापोली पाठोपाठ रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे गुवाहाटीला रवाना झाल्याचे वृत्त आले. त्यामुळे रत्नागिरी-संगमेश्‍वर मतदारसंघात खळबळ उडाली. मंत्री सामंत हे २००४ ला राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आले होते. पुढे दोनवेळा ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले. त्यांनी नगरविकासमंत्री पदासह नऊ खाती सांभाळतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सव्वा वर्षे यशस्वी कामकाज केले. पुढे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी ते शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर सलग दोन वेळा शिवसेनेकडून विधानसभेत गेले. सध्या ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चांगला प्रभाव आहे. सामंत गुवाहाटीला रवाना झाल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनीही सावध भूमिका घेतली आहे.

वरिष्ठांचे आदेश आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील भूमिका घेणार असल्याचे पदाधिकाऱ्‍यांकडून व्यक्त केले जात आहे. पदाधिकाऱ्‍यांकडूनही धोरण जाहीर करण्यात आलेले नसल्याने काय करायचे, याबाबत सर्वसामान्य शिवसैनिक अजूनही संभ्रमात आहे.

राष्ट्रवादीमधून २०१४ ला आलेल्या सामंत यांनी पदाधिकाऱ्‍यांसह कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल झाले. तीच परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ शकते. शिवेसेनेतील समर्थकही त्यांच्याबरोबर राहतील, अशी शक्यता सध्या आहे. निवडणुकीत कशा पद्धतीने यंत्रणा राबवायची, हे तंत्र सामंत यांनी आत्मसात केले असल्यामुळे भविष्यात ते कुठूनही रिंगणात उतरले तरीही ते विजयापर्यंत पोचू शकतात.

दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांशी चर्चा

शिंदे गटाला सामील होण्यापूर्वी पाली येथील निवासस्थानी उदय सामंत यांनी शिवसेनेतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला होता. पाली येथे दिवसभरात दोन वेळा बैठकाही झाल्या. मुंबईतील परिस्थिती त्यांनी शिवसैनिकांपुढे मांडली होती. तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्‍या परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज राहा, असेही सामंत यांनी सांगितले होते. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण करण्यात ते यशस्वी झाल्याचेच चित्र आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेनेमधून त्यांच्या विरोधात उद्रेक होणे अशक्य असल्याचे दिसते. अनेक प्रमुख पदाधिकाऱ्‍यांनी सामंत यांच्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना सावध भूमिका घेतली.

भाजपकडेही तगडा उमेदवार नाही

उदय सामंत यांचा रत्नागिरीसह लांजा-राजापूर-संगमेश्‍वर या विधानसभा मतदारसंघातही चांगले वर्चस्व आहे. ते शिंदे गटात सामील झाल्यामुळे मोठा फटका शिवसेनेला बसू शकतो. रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेला दुसरे नेतृत्त्व नाही. बंड कायम राहिले किंवा बंडखोर सेनेतून भाजपमध्ये गेल्यास रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विद्यमानांना भाजपकडून संधी मिळू शकते. सध्या या मतदारसंघात तगडा उमेदवार भाजपकडेही नाही. त्याचा फायदा निश्‍चितच सामंत यांना मिळू शकतो.

Web Title: Ratnagiri Samanta Group Change Hits Sena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..