छोटी चूकही जीवावर बेतली असती

मकरंद पटवर्धन 
मंगळवार, 10 जुलै 2018

रत्नागिरी - सवतकडा धबधब्याच्या प्रवाहात अडकलेल्या चौघांना वाचवणे आवश्‍यक होते. मुसळधार पाऊस, लोकांची गर्दी यामुळे मदत कार्यात अडथळे येत होते. परंतु सेफ्टी इक्विपमेंटचे प्रात्यक्षिक दाखवूनच चौघांना दोरखंडाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. यात चूक झाली असती तर वाहून जाण्याची भीती होतीच. ते तीन तास थरारक होते. टीमवर्कमुळे सर्वांचे जीव वाचले, असे रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे गणेश चौघुले सांगत होते.

धबधबा परिसरात अडकलेल्या १३ जणांना रत्नदुर्गने वाचवले. याविषयी चौघुले म्हणाले, पाणी गढूळ झाल्यावर लगेचच रॅपलिंग थांबवले. दोनच्या सुमारास रॅपलिंगचे साहित्य आवरताना खालच्या भागातून वाचवा, वाचवा, असा आरडाओरडा कानी पडला. लगेचच आम्ही खाली धाव घेतली.एका बाजूला नऊ जण, मध्यभागी दोन व आणखी खालील भागात दोन जण अडकले होते. हे चौघे जण प्रवाहात असल्याने खूप धोक्‍यात होते. या चौघांना प्रथम वाचवायचे ठरवले. वरच्या भागातून रोप फेकला. तो प्रवाहात वाहत जाऊन त्यांच्यापर्यंत पोचला. सेफ्टी इक्विपमेंटचा वापर करून ते आपल्या शरीराला कसे बांधावे, याचे  किनाऱ्यावरून प्रात्यक्षिक दाखवले. पाऊस, धबधब्याचा मोठा आवाज, वारा व लोकांच्या गोंगाटामुळे त्यांना प्रात्यक्षिकातूनच दाखवले. इक्विपमेंट घालून अमित चौधरी व शर्मा यांना किनाऱ्यावर आले.खालील भागातील दोघांना तशाच प्रकारे बाहेर आणले. एका बाजूला असलेल्या ९ जणांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. रत्नदुर्गचे अक्षय चौघुले आणि सूरज यांना दोरखंडाच्या साह्याने पलीकडे पाठवले. झाडाला दोरखंड बांधला व सेफ्टी इक्विपमेंटच्या साह्याने एकेकाला पाण्याबाहेर आणले.

टीम रत्नदुर्ग
रत्नागिरीतून रॅपलिंगसाठी आलेल्या अमेय पावसकरला पावसामुळे रॅपलिंग करता आले नाही; पण मदतकार्यात त्याने धडाडीने खूप मदत केली. रत्नदुर्गच्या जितेंद्र शिंदे, हर्ष जैन, सूरज बावने, प्रांजली चोप्रा व विक्रम चौघुले यांनी बचावकार्यात योगदान दिले.

Web Title: Ratnagiri Sawatkada waterfall