काँग्रेस आघाडीची पारंपरिक मतावरच भिस्‍त

तुषार सावंत
सोमवार, 18 मार्च 2019

कणकवली - कोकणातील काँग्रेसचा किल्ला ढासळलेला आहे. तरीही रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार दिल्याने आघाडीच्या बुडत्या नावेला काठीचा आधार मिळणार आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या पारड्यातली मते खेचण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांची गरज आहे; मात्र तूर्तास काँग्रेस आघाडीची पारंपारिक मतांवरच मदार असल्याचे चित्र आहे.

कणकवली - कोकणातील काँग्रेसचा किल्ला ढासळलेला आहे. तरीही रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार दिल्याने आघाडीच्या बुडत्या नावेला काठीचा आधार मिळणार आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या पारड्यातली मते खेचण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांची गरज आहे; मात्र तूर्तास काँग्रेस आघाडीची पारंपारिक मतांवरच मदार असल्याचे चित्र आहे. 

कोकण पट्ट्यात काँग्रेस हा वर्षानुवर्षे रुजलेला पक्ष होता. तरीही लोकसभेला समाजवादी पक्ष किंवा जनता दल यांचे उमेदवार निवडून यायचे; पण विधानसभेला काँग्रेसचा वरचष्मा असायचा. मात्र, ९०च्या दशकापासून शिवसेनेचा झंझावात नारायण राणे यांनी कोकणात आणला व काँग्रेसची वाताहत सुरू झाली.

राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आल्यावर हा पक्ष एका रात्रीत जिल्ह्यात नंबर एकवर पोहोचला; पण राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी पुन्हा उभारी घेऊ शकली नाही. राणेनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तेव्हा २००६ पासून २०१७ पर्यंत कोकणात काँग्रेसचा दबदबा होता. या काळात राणेंनी जुन्या काँग्रेसमधील सक्रिय असलेल्यांना आपलेसे केले. त्यामुळे राणे गेल्यानंतर ते कार्यकर्तेही त्यांच्यासोबत गेले. परिणामी पक्ष आणखी दुबळा झाला.

आज लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिला तरी, त्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस आघाडीकडे सक्षम कार्यकर्त्यांचा अभाव आहे. बरेचसे कार्यकर्ते राणे यांच्या स्वाभिमान पक्षाच्या दावणीला बांधले जातील, अशी शक्‍यता आहे. या मतदारसंघातील अँटी हिंदूत्ववादी मते ही काँग्रेसची एक गठ्ठा मते मानली जात होती; मात्र आता शिवसेना व भाजपला पर्याय म्हणून राणेंचा स्वाभिमान पक्ष पुढे आला आहे. त्यामुळे ही मतेही काँग्रेसकडे राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

हा मतदार संघ आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसकडे जातो. काँग्रेसने या लोकसभा मतदारसंघासाठी उद्योजक नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे नाव पुढे केले आहे. परंतु अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. संभाव्य उमेदवार म्हणून बांदिवडेकर हे ज्या भंडारी समाजातून नेतृत्व करतात, त्या समाजाची एक गठ्ठा मते मिळवणे, ही त्यांची जमेची बाजू ठरू शकते. याचबरोबर खलाट पट्ट्यातील गाबित समाज, मच्छीमार समाज, कुणबी समाज कोणत्या पक्षाच्या मागे राहणार, यावरही काँग्रेसचे राजकीय गणित ठरणार आहे. गेल्या सात-आठ वर्षात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नव्या पिढीतील तरुणांना कार्यकर्ता म्हणून संधी दिली नाही. लोकसभेच्या दृष्टीने काँग्रेस आघाडीच्या निवडणूक हालचाली सगळ्यात मंद आहेत.

निवडणूक जिंकण्यासाठीचा उत्साह ना कार्यकर्त्यांत ना, नेत्यांमध्ये अशी स्थिती आहे. जिल्ह्यात अजूनही काँग्रेसला मानणारी मते आहेत. शिवाय मोदी विचारधारेच्या विरोधातील मतेही काँग्रेसकडे वळू शकतात. मात्र, काँग्रेस सक्रिय कधी होणार, असा प्रश्‍न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

राष्ट्रवादीचे गणित
या मतदार संघात राष्ट्रवादी स्वाभिमानच्या डॉ. निलेश राणे यांना पाठिंबा देईल, अशी चर्चा आहे; मात्र हे गणित जुळणे कठीण आहे. कारण मुळात आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसकडून राष्ट्रवादीला ही जागा घ्यावी लागेल. त्या बदल्यात दुसरी जागा सोडावी लागेल. शिवाय काँग्रेस व राणे यांच्यातील संबंध फारसे चांगले नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency special