रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचा स्वबळावरच भर

संदेश सप्रे
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

देवरूख - लोकसभा निवडणुकीत वरिष्ठांनी युती केली तरीही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत व्हावी. आम्हाला स्थानिक पातळीवर शिवसेनेशी युती नको आहे. युती झाली तर मैत्रीपूर्ण लढत करून विजयी होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी मागणी करण्यात येणार आहे.

देवरूख - लोकसभा निवडणुकीत वरिष्ठांनी युती केली तरीही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत व्हावी. आम्हाला स्थानिक पातळीवर शिवसेनेशी युती नको आहे. युती झाली तर मैत्रीपूर्ण लढत करून विजयी होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी मागणी करण्यात येणार आहे.

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपने स्वबळावरच लढावे. येथून विद्यमान केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपचे रत्नागिरी - सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन करणार आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी सकाळशी बोलताना दिली. 

माने म्हणाले, २०१४ रोजी शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी भाजपच्या साथीने तब्बल दीड लाख मतांनी विजय मिळवला. भाजपने निःस्वार्थीपणे मदत करुनही गेल्या पाच वर्षांत खासदारांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे एकही विकासकाम केलेले नाही वा आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारची कामे दिलेली नाहीत.

केंद्रात मंत्री झाल्यापासून सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेसाठी केलेले काम, जयगड डिंगणी रेल्वे मार्गाची झालेली प्रगती, दोन नव्या मार्गांसाठी सुरु झालेले काम, वाणिज्य मंत्री झाल्यावर त्यांनी कोकणसाठी केलेली कामे ही त्यांच्या विजयासाठी पुरेशी आहेत. मतदारसंघात प्रभू यांची प्रतिमा मतदारांना नक्‍कीच आकर्षित करेल. केंद्रात भाजपचा एक खासदार वाढवायचा असेल तर हीच संधी आहे. जनता शिवसेनेच्या मनमानीला कंटाळली आहे. प्रभू यांच्या रूपाने इथला खासदार बदलला की, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही असा दावा त्यांनी केला. 

खासदार राणे यांची भेट घेणार
नारायणराव राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष आहे. त्यांनीही आगामी निवडणुकीत आपला उमेदवार उभा न करता प्रभू यांच्या रूपाने भाजपला पाठिंबा द्यावा, यासाठी हेच शिष्टमंडळ खा. राणे यांची भेट घेणार आहे. ते मागणीला सकारात्मक पाठिंबा देतील, असा विश्‍वास माने यांनी व्यक्‍त केला.

अमित शहांना अफजल खान ठरवले
अमित शहा यांना अफजल खान ठऱवण्यापासून ते मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान यांचा वारंवार अपमान करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. हे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना सहन होण्यासारखे नाही. यामुळेच आम्ही या मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवू इच्छितो, हे वरिष्ठांसमोर मांडणार आहे, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri-Sindhudurg Loksabha constituency special