पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांना फुलांनी सजलेल्या जीपमधून रॅली काढत दिला निरोप

राजेश कळंबट्टे | Monday, 21 September 2020

तक्रारदारांशी चांगला संवाद साधला तर कोणत्याही अडचणी उद्भभवत नाही,

रत्नागिरी : अधिकार्‍यांची बदली होते, निरोप समारंभ होतो, मात्र आज जे रत्नागिरीकरांनी मला भरभरून प्रेम दिले, हा आगळा वेगळा सन्मान केला हा दिवस माझ्यासाठी खरोखरच ऐतिहासिक असल्याची भावनिक प्रतिकिया पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केली.

डॉ. प्रवीण मुंढे यांची जळगांव येथे बदली झाली असून रविवारी येथील पोलीस मुख्यालय बहुउद्देशीय हॉलमध्ये त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यकार्यकारी अधिकारी इंदुराणी जाकड, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पांताधिकारी विकास सूर्यवंशी, मुख्याधिकारी पशांत ठोंबरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पवीण पाटील, पोलीस उपअधीक्षक आयुब खान, उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे, लक्ष्मण खाडे, सौ.खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा- सिंधुदुर्गात धुंवाधार : पूरस्थिती धोका निर्माण होण्याची शक्यता -

गेल्या दोन वर्षात रत्नागिरीकरांनी आपल्या प्रत्येक कामात चांगला प्रतिसाद दिला, चकीवादळ असेल वा कोरोना काळात पोलीसांना नागरिकांचे चांगले सहकार्य केले. कोणत्याही संकट काळात रत्नागिरीकर पोलीसांच्या बरोबर उभे राहिले. त्यामुळे याठिकाणी 2 वर्ष कधी पूर्ण झाली कळले नाही. पोलीस स्टेशनला आल्यानंतर तक्रारदारांशी चांगला संवाद साधला तर कोणत्याही अडचणी उद्भभवत नाही, कारण तकारदाराला पोलीसांनी आपली विचारपूस करून न्याय मिळवून द्यावा आणि दोन शब्द समजावून सांगावे इतकीच अपेक्षा असते असे केले तर पोलिसांना काम करताना कोणत्याही अडचणी येत नसल्याचे यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले. या 2 वर्षाच्या कारकीर्द जे काही पोलीस दल आणि रत्नागिरीकरांसाठी सामाजिक बांधिलकीतून करणे शक्य होते ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. यावेळी माझ्या संपूर्ण टीमने मला पूर्ण साथ दिली असेही त्यांनी सांगितले.

डॉ. प्रवीण मुंढे यांनी जिल्ह्यात पोलीस दलाच्यावतीने अनेक उपकम राबविले आहेत. इतक्या कमी कालावधीत इतके मोठे कार्य त्यांनी केले असून खरोखरच त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्यांच्या या निरोप समारंभाला उपस्थित असलेल्या रत्नागिरीकरांकडे पाहूनच त्यांच्या कार्याची ओळख होते अशी प्रतिकिया यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी इंदूराणी जाकड यांनी व्यक्त केली.

यावेळी पत्रकार प्रतिनिधी म्हणून किशोर मोरे, हेमंत वणजू, फोटोग्राफर तन्मय दाते, तर सामाजिक संस्थांच्यावतीने महेश गर्दे, डॉ.तोरल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस दलाच्यावतीने पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक निशा जाधव, वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभुते, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड, ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, आरटीओचे वाहन निरीक्षक मोराडे, डिवायएसपी पवीण पाटील, डिवायएसपी गणेश इंगळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

…अन् फुलांनी सजलेल्या जीपमधून आगळी वेगळी रॅली काढली
यावेळी डॉ. प्रवीण मुंढे यांची फुलांनी सजवलेल्या जीपमधून पोलीस मैदानात रॅली काढण्यात आली, जिल्ह्यातील सर्व अधिकारी रॅली सहभागी झाले होते. रत्नागिरी पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशापकारे निरोप समारंभ पार पडला, ही रॅली पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होते.

संपादन - अर्चना बनगे