
रत्नागिरी : साडेबारा लाख पळविणाऱ्या चोरट्यास २४ तासांत अटक
रत्नागिरी/राजापूर : आंबा खरेदी व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची १२ लाख ६५ हजार २४० रुपये रक्कम असलेली बॅग चोरणाऱ्या चोरट्याला नाटे पोलिसांनी २४ तासांत गजाआड केले. ऑपरेशन नेत्रांतर्गत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून संशयित पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याच्याकडून सर्व रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. कात्रादेवी (ता. राजापूर) येथे ही घटना घडली.
रेहान बाबामियॉं मस्तान (वय ३४, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवार ते बुधवारी (ता. ११) मध्यरात्रीच्या सुमारास कात्रादेवी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नौशाद महामुद शेकासन (वय ५६, रा. राहत अपार्टमेंट, रत्नागिरी) यांचा आंबा खरेदीचा व्यवसाय आहे. ते आंबा खरेदीसाठी १२ लाख ६५ हजार २४० रुपये रक्कम असलेली बॅग घेऊन राजापूर येथील कात्रादेवी येथे नऊ कामगारांसह तंबू मारून राहात होते. मंगळवारी (ता. १०) ते संपूर्ण रकमेची बॅग उशाला ठेवून झोपले होते. तेव्हा चोरट्याने ती बॅग पळवली. या प्रकरणी शेकासन यांनी नाटे पोलिस ठाण्यात तक्रार दिली
तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील संशयिताचा शोध घेऊन उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी लांजा श्रीनिवास साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी पोलिस ठाणे नाटेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील हे याचा तपास करीत होते. नाटे पोलिस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांचे पथक तयार करून तपास सुरू केला. पथक कात्रादेवी येथे तंबू मारून शेकासन आंबा खरेदी करत असलेल्या परिसरात संशयिताबाबत पोलिस माहिती घेत होते.
तेव्हा कात्रादेवी चौक येथे ऑपरेशन नेत्रांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे लक्षात आले. त्यांनी त्याचे फुटेज पाहिले आणि त्यावरून गुन्ह्यातील संशयित रेहान मस्तान निष्पन्न झाला. त्याच्याकडून चोरीची सर्व १२ लाख ६५ हजार २४० रुपयांची रक्कम २४ तासात पोलिसांनी हस्तगत केली. सागरी पोलिस ठाणे नाटेचे पोलिस निरीक्षक श्री. पाटील, पोलिस हवालदार विकास चव्हाण, शशांक फणसेकर, नरेंद्र जाधव, पोलिस नाईक प्रसाद शिवलकर, कुशल हातिसकर, पोलिस शिपाई गोपाळ चव्हाण, चालक विनोद रसाळ तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हवालदार सुभाष भागणे, शांताराम झोरे, बाळू पालकर, सागर साळवी, चालक अनिकेत मोहिते या टीमने ही कारवाई केली.
Web Title: Ratnagiri Thief Stole 125 Lakh Arrested 24 Hours
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..