Ratnagiri Dam Mishap : शरद पवार यांनी दिला मदतीचा हात 

मुझफ्फर खान
सोमवार, 8 जुलै 2019

चिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज तिवरे धरण दुर्घटनेतील आपदग्रस्तांची भेट घेतली. विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर असताना शिवसेनेच्या आमदाराने बांधलेले तिवरे धरण फुटले. याचे भांडवल न करता आपदग्रस्तांचे सांत्वन केले.

चिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज तिवरे धरण दुर्घटनेतील आपदग्रस्तांची भेट घेतली. विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर असताना शिवसेनेच्या आमदाराने बांधलेले तिवरे धरण फुटले. याचे भांडवल न करता आपदग्रस्तांचे सांत्वन केले.

पक्षाकडून मदत केलीच त्याशिवाय सरकारी पातळीवरून मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे शरद पवार यांच्यातील माणुसकीचे दर्शन तिवरेवासीयांना घडले. जाणत्या नेत्यामधील प्रगल्भता आणि उंची साऱ्याना पुन्हा जाणवली. 

चिपळूणमध्ये 26 जुलै 2005 ला महापूर आला. जिल्ह्यात येण्याचे मार्ग धोकादायक बनलेले होते. आमदार भास्कर जाधव यांनी पूर परिस्थितीची माहिती दिल्यानंतर शरद पवार दुसऱ्या दिवशी सातारमार्गे चिपळुणात आले. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना त्यांनी चिपळूणला येण्यास प्राधान्य दिले. योगायोगाने तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली. तिवरे धरण फुटल्यानंतर 12 घरे आणि 23 माणसे वाहून गेली. याची माहिती आमदार भास्कर जाधव आणि शेखर निकम यांनी पवार यांना दिल्यानंतर सातारामार्गे आज सकाळी ते चिपळुणात दाखल झाले. विशेष म्हणजे आजही संसदेचे अधिवेशन सुरू असताना पवारांनी तिवरे धरणग्रस्तांच्या भेटीला प्राधान्य दिले. 

आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "धरणात पाणी नाही तर ..? असे विधान केले होते. शिवसेनेसह विरोधी पक्षानी त्याचे भांडवल केले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली. तिवरे धरण शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांनी बांधले आहे.

ठेकेदार आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. खेकड्यांनी धरण फोडल्याचे जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितल्यानंतर राज्यातून शिवसेनेवर टीका झाली. शरद पवार आज आपदग्रस्तांची भेट घेतल्यानंतर या विषयावर भाष्य करतील आणि संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटतील असे सर्वांना वाटले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला घेरण्यासाठी राष्ट्रवादीकडे आयती संधी असताना शरद पवारांनी या विषयावर राजकीय भाष्य करण्याचे टाळले.

योग्य ते कारण समोर येईल

मी राजकीय आरोप-प्रत्यारोप करणार नाही. कोणाच्या चुका काढणार नाही. या घटनेची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समितीची नेमणूक केली आहे. त्यातून योग्य ते कारण समोर येईल. मात्र तिवरेतील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न मी करेन, असे पवार सांगत शरद पवार यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Tivare Dam incidence Sharad Pawar visit