esakal | Ratnagiri : धरणग्रस्तांना छतावरचेच पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

Ratnagiri : धरणग्रस्तांना छतावरचेच पाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर येथील बाधित कुटुबांचे अलोरे येथे पुनर्वसन करण्यात आले. येथील २४ घरांचे तीन महिन्यांपूर्वी लोकार्पण करण्यात आले. बाधित कुटुबांचे पुनर्वसन झाले तरी त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली नाही. संबंधित ठेकेदारास कामाचे आदेश दिले तरी त्यास अद्याप सुरुवात झालेली नाही. परिणामी धरणग्रस्तांना छतावर पडणारे पावसाचे पाणी साठवून तेच गरम करून प्यावे लागते आहे. येथील कुटुंबीयांनी उपसभापतींची भेट घेत, पाणी समस्या सोडविण्याची मागणी केली.

सह्याद्रीच्या कुशीत बांधलेले तिवरे धरण दोन वर्षापूर्वी फुटले होते. यात धरणाच्या पायथ्याशी असलेल्या भेंदवाडीतील २२ जणांचा बळी गेला होता. दरम्यान, २ वर्षानंतर येथील २४ कुटुंबांचे अलोरे येथे पुनर्वसन झाले. पुनर्वसनातील घरांच्या बांधकामासाठी मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टने ५ कोटींचा निधी दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३ कोटी ८० लाख खर्चून ही घरे उभारण्यात आली.

पाउस कमी झाल्यानंतर...

२ जुलैला मुख्यमंत्र्याच्या हस्ते या घरांचा लोकार्पण सोहळा झाला. मुळात घरांची कामे अर्धवट असताना गडबडीत लोकार्पण सोहळा झाला. २४ कुटुंबांची निवासाची व्यवस्था झाली. मात्र, तेथील पाणी योजनेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. घरांची कामे मार्गी लागली, कुटुंबे राहायला आली तरी पाणी योजनेचा पत्ता नाही. येथील कुटुंबांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर पाण्याची समस्या बिकट होत आहे.

हेही वाचा: बार्शीत दरोडा! नवीन ट्रॅक्‍टर-ट्रॉलीसह 15 लाखांचा ऐवज लंपास

अलोरे येथे पुनर्वसन ठिकाणी पाणी समस्या आहे. येथील २४ घरांसाठी पाणी योजना मंजूर आहे. पाण्याअभावी यापुढे ग्रामस्थांचे हाल होणार आहेत. ठेकेदाराला काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

-प्रताप शिंदे, उपसभापती, चिपळूण

एक दृष्‍टिक्षेप..

  1. तिवरे धरण फुटले : २ वर्षापूर्वी

  2. भेंदवाडीतील बळींची संख्या : २२

  3. अलोरे येथे पुनर्वसन केले : २४ कुटुंब

  4. सिद्धिविनायक ट्रस्टने निधी दिला : ५ कोटी

  5. सा.बां.वि.ने घरे उभारणीवर खर्च केलाः ३ कोटी ८० लाख

२४ घरांसाठीची योजना मंजूर तरीही..

येथील २४ घरांसाठीची पाणी योजना यापूर्वीच मंजूर झाली आहे. संबंधित ठेकेदारास कामाचे आदेशही देण्यात आले. तरीही पाणी योजना मार्गी लागत नसल्याने धरणग्रस्तांनी उपसभापती प्रताप शिंदे व गटनेते राकेश शिंदे यांची भेट घेत पाणी योजनेची समस्या मांडली. त्यानुसार उपसभापतींनी संबंधित ठेकेदारास तत्काळ काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, ठेकेदाराने अद्याप त्यावर कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे येथील कुटुंबांना पाण्यासाठी भटकावे लागणार आहे

loading image
go to top