रत्नागिरी जिल्हा परिषदेतील बारा जणांवर सेवा समाप्तीची टांगती तलवार

राजेश कळंबटे
रविवार, 5 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - तीन अपत्य असलेल्या कर्मचार्‍यांवरील कारवाईसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलली आहेत. यामध्ये 116 कर्मचार्‍यांचा समावेश असून 2005 पुर्वीचे 104 तर त्यानंतरच बारा कर्मचारी आहेत. बारा कर्मचार्‍यांना मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे.

रत्नागिरी - तीन अपत्य असलेल्या कर्मचार्‍यांवरील कारवाईसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलली आहेत. यामध्ये 116 कर्मचार्‍यांचा समावेश असून 2005 पुर्वीचे 104 तर त्यानंतरच बारा कर्मचारी आहेत. बारा कर्मचार्‍यांना मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे. त्यांच्यावर सेवा समाप्तीची टांगती तलवार निर्माण झाली आहे; मात्र उर्वरित 104 जणांविषयी शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.

लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र या अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी जिल्हा परिषदेकडून सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील सर्व आस्थापनेवरील कर्मचार्‍यांना अपत्याबाबतची माहिती बंधपत्राद्वारे सादर करण्याचे आदेश होते. या निर्णयामुळे अनेकांचे धाबे दणाणले. शासकीय सेवेत कर्मचारी रूजू होतानाच त्याच्याकडून बंधपत्र लिहून घेण्यात येते. परंतु, अनेक कर्मचारी हे लग्नापूर्वीच सेवेत रूजू होतात. त्यामुळे त्यांच्या अपत्याबाबतची गणना झालेली नाही. यापुढे सेवेत दाखल होणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना दोन अपत्यांची अट मान्य करूनच सेवेत रूजु करून घेतले जाणार आहे. त्यामुळे यापुढे तीन अपत्य असलेल्या उमेदवारांसाठी शासकीय सेवेचा दरवाजा बंदच राहणार आहे.

तीन अपत्य असलेले 116 कर्मचारी आढळले आहेत. यामध्ये 2005 पूर्वीचे सर्वाधिक 104 कर्मचारी आहेत. तर 2005 नंतर 12 कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे 2005 नंतर तीन अपत्य असलेले सर्व कर्मचारी हे शिक्षकच आहेत. शिक्षक संघटनांनीही यासंदर्भात कारवाई करू नये अशी भूमिका घेतली आहे. 

दत्तक मुलाचा पर्याय

नियम अंमलात येण्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीत एकाच प्रसुतीत एकापेक्षा अधिक जन्मलेली मुले अनर्हतेसाठी विचारात घेतली जाणार नाही. 2006 आणि त्यानंतर तिसरे अपत्य असल्यास संबंधित सरकारी कर्मचार्‍याच्या नोकरीवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. दत्तक मुलांनाही त्यातून वगळण्यात आले आहे. याचा लाभ राज्यातील एका अधिकार्‍याला मिळाला होता; मात्र याचे अधिकार पूर्णतः शासनाकडे राहणार आहेत.

2005 नंतर तिन अपत्य असलेल्या 104 कर्मचार्‍यांबाबत कोणता निर्णय घ्यावा, याबाबत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे.

-  एस. एस. सावंत, सामान्य प्रशासन

Web Title: Ratnagiri Zhila Parishad three Offspring issue