विश्‍वास नाही, तिथे काम कसे करायचे?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

आमदार उदय सामंत यांचे कट्टर समर्थक राजेश सावंत यांनी सेनेशी फारकत घेण्याचे निश्‍चित केले आहे. लवकरच ते भाजप प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. सेनेतील पक्षांतर्गत राजकारणाचे ते बळी ठरले आहेत.

सेनेतील राजकीय खेळीचे राजेश सावंत बळी ः फारकत घेण्याचे निश्‍चित; भाजपमध्ये जाण्याची चर्चा

रत्नागिरी - आमदार उदय सामंत यांचे कट्टर समर्थक राजेश सावंत यांनी सेनेशी फारकत घेण्याचे निश्‍चित केले आहे. लवकरच ते भाजप प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. सेनेतील पक्षांतर्गत राजकारणाचे ते बळी ठरले आहेत. त्यांच्याविरुद्ध काहींनी कट-कारस्थान रचून वरिष्ठांपुढे त्यांना पुरते गद्दार ठरविले. जिथे विश्‍वास नाही, तिथे काम कसे करायचे म्हणून टोकाची भूमिका त्यांनी घेतल्याचे समजते. सावंत यांच्या या निर्णयाने सेनेला फार मोठा नाही, परंतु काहीसा हादरा बसणार हे निश्‍चित. 

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि विद्यमान उपनगराध्यक्ष राजेश सावंत स्पष्टवक्ते आहेत. त्यामुळे काहींना त्यांचे बोलणे खटकते; परंतु माणसे जोडण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. आमदार उदय सामंत यांनी राजकीय करिअर सुरू केल्यापासून राजेश सावंत यांनी त्यांच्यासोबत काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतेही पद नव्हते. तरीही ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सामंत यांना विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर २००४ पासूनच्या ते २००९ पर्यंत या निवडणुकीत त्यांच्या टीमवर्कबरोबर राजेश सावंत यांच्या राजकीय खेळी यशस्वी ठरल्या. तेव्हा भाजपनेही राजेश सावंत यांना ऑफर दिली होती; मात्र मित्राबरोबर गद्दारी नको म्हणून त्यांनी ती धुडकावली.

उदय सामंत आणि राजेश सावंत अशा नाण्याच्या दोन बाजू म्हणूनच राजकारणामध्ये त्यांची ओळख आहे. सामंत मंत्री असताना सामंत विरुद्ध भास्कर जाधव असा वाद टोकाला गेला होता. भास्कर जाधव यांच्याशी राजेश सावंत यांचे जवळेच संबंध आहेत; परंतु तिथेही मैत्रीखातर राजेश सावंत यांनी उदय सामंत यांच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला. २०१४ ला आयत्यावेळी उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. यावेळी राजेश सावंत यांनी उदय सामंत यांच्यासाठी जुने-नवे वाद मिटविण्यासाठी मेहनत घेतली होती. त्यानंतर पालिकेत उपनगराध्यक्षपदासाठी ते इच्छुक होते. सर्वांचा त्याला पाठिंबा होता. आयत्यावेळी काहींना त्याला विरोध केला. त्यामुळे वातावरण गढूळ झाले. 

घरगुती कारणांमुळे अनुपस्थित...
एका जाहिरातीरून वरिष्ठांनी त्यांना कानपिचक्‍या दिल्या. झालेली चूक जाणीवपूर्वक झालेली नव्हती, हे त्यांना वरिष्ठांपुढे सिद्ध करता आले नाही. काही बैठकींना त्यांना घरगुती आणि अडचणींमुळे उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलचे मत वाईट झाले. जवळच्यांनीही त्यांची बाजू वरिष्ठांपुढे मांडली नाही. याची त्यांना मोठी खंत आहे. आपल्याच माणसांचा आपल्यावर विश्‍वास राहिला नाही, तर आपण काम कसे करायचे. हा निर्णय घेताना किती त्रास होतोय, हे फक्त मलाच माहिती, अशी त्यांची वाक्‍ये चर्चेदरम्यान पुढे आली.

Web Title: ratnagrir news Shivsena politics issue