विरोधातील गावे वगळून रिफायनरी - बाळ माने

राजेश कळंबटे
शुक्रवार, 30 मार्च 2018

रत्नागिरी - नाणार (ता. राजापूर) येथे नियोजित रिफायनरी प्रकल्पाला विरोध असलेल्या त्या तीन गावांना वगळून उर्वरित मोकळ्या जागेत प्रकल्प राबवावा, असा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी येथे दिली.

रत्नागिरी - नाणार (ता. राजापूर) येथे नियोजित रिफायनरी प्रकल्पाला विरोध असलेल्या त्या तीन गावांना वगळून उर्वरित मोकळ्या जागेत प्रकल्प राबवावा, असा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी येथे दिली.

खासदार विनायक राऊत यांचा प्रकल्प विरोध आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयात-निर्यात क्षेत्रातील खासगी कंपन्यांच्या सांगण्यावरून आहे की काय, असा संशय त्यांनी व्यक्‍त केला.

शंकांचे निरसन मुख्यमंत्री करणार
श्री. माने म्हणाले, ‘‘प्रकल्पाबाबत विरोध करणाऱ्यांचे शंका निरसन स्वतः मुख्यमंत्री करणार आहेत. या प्रकल्पाबाबत ज्या विरोधकांच्या शंका आहेत, त्या मुख्यमंत्री स्वतः दूर करणार आहेत. लवकरच पेट्रोलियम कंपनीमार्फत जमिनीचे दर 
निश्‍चित केले जातील.’’

येथील भाजप कार्यालयात श्री. माने पत्रकारांना म्हणाले, ‘‘नाणार प्रकल्पात तीन लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. साडेतेरा हजार एकर जमीन खरेदी केली जाणार आहे.  ४२ हजार ५०० जमीनमालक असून त्यातील १४ टक्‍के लोकांचा विरोध आहे. ६० टक्‍के शेतकऱ्यांनी आपली भूमिका मांडलेली नाही. २४ टक्‍के लोक सकारात्मक आहेत. हा प्रकल्प आल्यामुळे देशाचा जीडीपी दोन टक्‍क्‍यांनी वाढणार आहे. एक लाख रोजगार निर्माण होणार असून पूरक उद्योगातून दोन कोटींची गुंतवणूक होईल.’’ 

ते म्हणाले, शेतकऱ्यांनी जमिनीसाठी हेक्‍टरी एक कोटी रुपये आणि आंब्याच्या प्रती झाडाला एक लाख रुपये दर मागितला आहे. तो प्रस्ताव विचाराधीन आहे. आधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प राबविला जाणार असून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, असे मॉडेल तयार करण्यात येणार आहे. घर, जागा गेली तरीही पर्यायी घर आणि जागा पुनर्वसनाच्या जागी देण्याबाबत विचार सुरू आहे.

ते म्हणाले, ‘‘सागवे, दत्तवाडीसह जवळच्या दोन गावांत प्रकल्पाला विरोध आहे. त्यांना वगळून सकारात्मक प्रतिसाद असलेल्या गावांमधील जमीन घेऊन प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यात कुंभवडे, जुवाठी यांचा समावेश आहे. ती दोन्ही गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसरात मोडतात.’’

शिवसेनेचा या प्रकल्पाबाबत गैरसमज झाला आहे. तो मुख्यमंत्री दूर करतील, असा विश्‍वास व्यक्‍त करून ते म्हणाले, ‘‘पेट्रोलियम उत्पादनांची आयात करावी लागते. रिफायनरी झाल्यानंतर त्यात मोठी घट होईल. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीयस्तरावर विरोध आहे. या लॉबीचे प्रतिनिधी म्हणून खासदार राऊत काम करीत असावेत. राऊत संसदेत प्रतिनिधित्व करतात. त्यांनी माहिती न घेता विरोध करणे गैर आहे. हा प्रकल्प कोकणच्या विकासासाठी आवश्‍यक आहे. सेनेचा विरोध गैरसमजातून आहे. जमिनी घेणारे परराज्यातील असल्याने त्यांनी भेटावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असावेत.’’

सामान्यांशी चर्चा करूनच
प्रकल्प राबविण्यासाठी पोलिस बळाचा वापर करू नये, अशा सक्‍त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प सामान्य लोकांशी चर्चा करूनच होईल, असे माने यांनी सांगितले.

Web Title: Ratngairi News Bal Mane comment