नारीशक्तीच्या एकजुटीने धाऊलवल्लीत रस्ता

राजेंद्र बाईत
रविवार, 28 जानेवारी 2018

राजापूर - नारीशक्ती एकत्र आल्यास त्यांच्या एकजुटीमधून समाजाला विकासात्मक दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य होऊ शकते हे महिलांनी अनेक वेळा दाखवून दिले आहे. तालुक्‍यातील धाऊलवल्ली, भाबलेवाडी येथील सुमारे ४३ महिलांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रस्त्याचे काम करीत साऱ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

राजापूर - नारीशक्ती एकत्र आल्यास त्यांच्या एकजुटीमधून समाजाला विकासात्मक दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य होऊ शकते हे महिलांनी अनेक वेळा दाखवून दिले आहे. तालुक्‍यातील धाऊलवल्ली, भाबलेवाडी येथील सुमारे ४३ महिलांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रस्त्याचे काम करीत साऱ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

या महिलांनी दोन वर्षांपूर्वी दोनशे आणि यावर्षी पाचशे अशा सुमारे सातशे मीटर रस्त्याचे काम केले. गावातील अनेक रोजगारासह अन्य विधायक कामे करून विकासाचे स्वप्न त्या बघत आहेत.

भाबलेवाडीतील सर्व महिलांनी एकत्र येत हा रस्ता तयार केला असून भविष्यामध्ये तो पूर्ण करणार आहोत. या रस्त्यासारखी गावातील छोटी-मोठी कामे, शोषखड्डे, गांडूळ खत प्रकल्प, शेती प्रकल्प करून त्याद्वारे गावविकास करण्याचा मानस आहे. या कामामध्ये अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
- प्रांजली बाणे,
मजूर महिला

भाबलेवाडी येथील लोकांची सोलगाव सड्याकडे मोठ्या प्रमाणात भातशेती आहे. या शेतामध्ये जाण्यासाठी पारंपरिक पाणंद (घाटी) असून तिचा वर्षानुवर्षे ये-जा करण्यासाठी येथील ग्रामस्थ उपयोग करतात. या पाणंदीचे रस्त्यामध्ये रूपांतर व्हावे, अशी या ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. अशावेळी रोजगार मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून भाबलेवाडी गोठणीचा पिंपळ ते सोलगाव सड्याकडे जाणाऱ्या पाणंदीचे रस्त्यामध्ये रूपांतर करण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने केला.

सरपंच मनोहर गुरव, उपसरपंच चंद्रकांत आपटे आणि ग्रामसेविका वंदना तळवडेकर यांनी पुढाकार घेत भाबलेवाडी येथील ब्राह्मणदेव, गुरुमाऊली, प्रताप महिला बचत गट आणि अन्य महिलांशी संपर्क साधला. दोन वर्षांपूर्वी या महिलांनी दोनशे मीटरचा रस्ता केला होता. त्यांचे तत्कालीन सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांनी कौतुक केले होते. 

त्यातून ऊर्मी घेत यावर्षीही पाणंदीचे ‘मग्रारो’ योजनेतून रस्त्यामध्ये रूपांतर करण्याचा निर्धार या महिलांनी केला. त्यांच्या निर्धाराला लोकप्रतिनिधींसह गटविकास अधिकारी शिवाजी माने, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. रोकडे, कृषी विभागातील विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे आदींनी सहकार्य केले. या पाठबळाच्या जोरावर महिलांनी सुमारे दोन किमी रस्त्यापैकी सातशे मीटरचा कच्चा रस्ता तयार केला आहे. पंचायत समिती सदस्य प्रकाश गुरव, अभिजित तेली आदींच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ झालेल्या रस्त्याच्या कामासाठी ग्रामपंचायतीने आवश्‍यक साधनसामग्री उपलब्ध करून दिली. 

Web Title: Ratngairi News women unity for road