साहसी ६४ जवानांच्या ताफ्याने केला ओखीचा सामना

साहसी ६४ जवानांच्या ताफ्याने केला ओखीचा सामना

रत्नागिरी - भारतीय लष्करच्या ६४ जवानांची १ डिसेंबरला मुंबई येथून सुरू झालेली एक महिना कालावधीची साहसी समुद्र सफर रत्नागिरीतून मुंबईकडे रवाना झाली. चार सी बर्ड प्रजातीच्या जहाजांतून सुरू असलेल्या समुद्र सफरीत प्रत्येक जहाजावर पाच अधिकारी होते. मोहिमेच्या बाराव्या दिवशी म्हणजेच (ता. १२) ला येथील किनाऱ्यावर आले. रत्नागिरीतील हा तीसरा टप्पा होता. या टप्प्यादरम्यान ओखी वादळाने निर्माण केलेल्या परिस्थितीचा या पथकाला सामना करावा लागला.

सकाळी साडेसात वाजता येथील भगवतीजेटीवरून हे पथक मुंबईकडे रवाना झाले. यातील प्रथम टप्पा मुंबई ते रत्नागिरी तर द्वितीय टप्पा रत्नागिरी ते गोवा या प्रवासांचा होता. या आधी देखील ही जहाजे पहिल्या टप्याच्या प्रवासात रत्नागिरी किनाऱ्यावर आली होती. प्रत्येक टप्प्यानंतर नवीन सैनिकांना पाचारण करून सर्वांना संधी दिली जात होती. यामध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचा तसेच राष्ट्रीय नौकायान अजिंक्‍यपद विजेते सैनिकांचा देखील समावेश होता. या सफारीमध्ये त्यांना समुद्रातील सर्वात कठिण परिस्थितींचा सामना करण्याचा अनुभव मिळत आहे.  

प्रवासातील पहिला दिवस हा शांत समुद्रामुळे सफारीसाठी अनुकूल ठरला तर दुसऱ्या दिवसापासून नौकायन ओखी या सागरी वादळामुळे खवळलेल्या समुद्रामुळे आव्हानात्मक ठरले होते. सैनिकांना दिलेल्या प्रशिक्षणामुळे व त्यांच्या अनुभवामुळे ते वादळामुळे दोन मीटर फुगवटा आलेल्या व जहाजांना अस्थिर करणाऱ्या समुद्रातून मार्गक्रमण करु शकले. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात वादळी हवामानावर त्यांनी मात केली. तुलनेत परतीचा प्रवास हा शांत समुद्रामुळे नौकायनासाठी अनुकूल ठरत आहे. चौथा टप्पा मुंबई येथे पोचून पूर्ण होणार आहे.

भारतीय लष्करातर्फे अनेक वेळा अशा समुद्र सफरींचे आयोजन केले जाते. मात्र  इतक्‍या मोठ्या संख्येने सैनिकांचा समावेश असलेली ही पहिलीच सफर आहे. सफरीचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल भुवन खरे यांचेकडे आहे. रत्नागिरी येथे भारतीय तटरक्षक दलातर्फे त्यांच्या आय सी-३०२ या नौकेने समुद्रात सफरीवरील या जहाजांचे मार्गदर्शन केले. तसेच या सफरीसाठी त्यांना रसद व आवश्‍यक ती मदत पुरविण्यात आली. नौदलाचे आयएनएस तराशा  हे जहाज या सफरीबरोवर सदैव तैनात ठेवले आहे.

प्रेरणादायी साहसकृत्य...
अशी साहसी कृत्ये ही भारतीय सेना दलांची ओळख असून यांमुळे सैनिकांमध्ये ऐक्‍य, संघभाव, समन्वय, जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती इत्यादि गुणांची जोपासना होते. हीच कृत्ये देशातील युवकांना सेना दलांत भारती होण्यासाठी सदैव प्रेरित करतात, अशी ग्वाही सैनिकांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com