कॉंग्रेस, शिवसेनेसाठी बंडखोरीची डोकेदुखी

Narayan_Rane_Konkan_
Narayan_Rane_Konkan_

वेंगुर्ले : येथील पालिकेत चौरंगी लढत होत असून, कॉंग्रेस व शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसण्याची भीती आहे. मात्र ही बंडखोरी थांबविण्यात कॉंग्रेस व शिवसेना किती यशस्वी होते हे 11 ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी समजणार आहे. ही निवडणूक पालकमंत्री दीपक केसरकर (शिवसेना), बंदर विकासमंत्री रवींद्र चव्हाण (भाजप) व माजी पालकमंत्री नारायण राणे (कॉंग्रेस) यांच्या प्रतिष्ठेची ठरली आहे.
पालिकेच्या 2011 च्या निवडणुकीत राजकीय पक्षाचा फायदा घेऊन एकहाती सत्ता मिळविलेला राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष या वेळी मागे पडल्याचे चित्र दिसत आहे. 18 पैकी 8 जागांवर नगरसेवकपदासाठी उमेदवार उभे केले आहेत. माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल या नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरल्या आहेत. केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वेंगर्लेतील राष्ट्रवादी पूर्णपणे दुभंगली. राष्ट्रवादीच्या पाच वर्षांच्या कालावधीत एकहाती सत्ता असूनही गटातटाच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीचे तालुक्‍यात प्राबल्य कमी झाले. गटातटाच्या राजकारणावरून तोडगा काढून राष्ट्रवादीला उभारी देण्याचे काम जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनाही करावेसे वाटले नाही. त्याचाच परिणाम या निवडणुकीत राष्ट्रवादीने उभ्या केलेल्या 17 पैकी केवळ 8 जागावरून दिसून येत आहे. त्याचा फटका राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नम्रता कुबल यांना बसण्याची शक्‍यता आहे; मात्र शिवसेना, भाजप व कॉंग्रेसने नगराध्यक्षपदासाठी दिलेल्या उमेदवारावरून पक्षांतर्गत वाद सुरू झाले. जे असंतुष्ट कार्यकर्ते व मतदार आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात सौ. कुबल यांना मतदान केले तर कुबल यांचा विजय पक्का आहे. सौ. कुबल या आपल्या जनसंपर्कावरून बाजी मारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राडा प्रकरणानंतर सत्ता गमावलेल्या कॉंग्रेसने यंदा निवडणुकीच्या माध्यमातून सावरण्यासाठी व आपले वर्चस्व पुन्हा एकदा अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केला होता; मात्र युवा नेते विलास गावडे यांना डावलून तालुकाध्यक्ष मनीष दळवी यांच्याकडे निवडणुकीची धुरा नारायण राणे यांनी सोपविल्याने नाराज झालेले कॉंग्रेस कार्यकर्ते बंडखोरी करून कॉंग्रेसच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवीत आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे आपले कॉंग्रेस सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. विलास गावडे यांनीही आपला या निवडणुकीशी संबंध नसल्याचे जाहीर केले आहे. राजकीय क्षेत्रात कार्यरत नसलेल्या बाबली वायंगणकर यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिल्याने कॉंग्रेसमधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ही नाराजी ते मतदानातून व्यक्त करणार आहेत. नारायण राणे यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कॉंग्रेसमधील एकंदरीत बंडखोरी पाहता व कार्यकर्त्यांमधील अंतर्गत नाराजी लक्षात घेता पक्षाला नगरपालिकेवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी विरोधकांपेक्षा स्वकियांचेच प्रहार झेलावे लागणार आहे. कॉंग्रेसने नगराध्यक्षपदाची उमेदवारी न दिल्याने बंडखोरी करून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणारे सुनील डुबळे व संदेश निकम हे दोन माजी नगराध्यक्ष व आत्माराम सोकटे हे माजी नगरसेवक यांच्यामुळे कॉंग्रेसला फटका बसण्याची शक्‍यता आहे. मागील निवडणुकीत खाते न खोललेली शिवसेना या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाने खाते खोलेल का व नगराध्यक्षपदी रमण वायंगणकर हे निवडून येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


येथे झालेल्या पक्षांतराच्या घडामोडीत बऱ्याच कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. 2011 च्या निवडणुकीत भाजपने तीन उमेदवार उभे केले होते. त्यापैकी दोन उमेदवार विजयी झाले होते. राष्ट्रवादीतून माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांनी आपले समर्थक राजन गिरप यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला व गिरप यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारीही मिळवूनही दिली. त्यामुळे नाराज झालेले भाजपचे माजी शहर अध्यक्ष संजय तानावडे हे बंडखोरी करून अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवीत आहेत.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com