संत निवृत्तीनाथांचे मान्यताप्राप्त चित्र साकार

संत निवृत्तीनाथांचे मान्यताप्राप्त चित्र साकार

सावंतवाडी - वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू असलेल्या संत निवृत्तीनाथांचे पहिले मान्यताप्राप्त तैलचित्र सावंतवाडीकर असलेले प्रसिद्ध चित्रकार आनंद ठोंबरे यांनी साकारले आहे. हे चित्र पूर्णतः संत नामदेवांनी केलेल्या निवृत्तीनाथांच्या वर्णनावर साकारले असून, ते आज (ता. २०) त्र्यंबकेश्‍वरकडे रवाना होणार आहे.

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांनी १२९७ मध्ये त्र्यंबकेश्‍वर येथे संजीवन समाधी घेतली. संत नामदेवांच्या ओव्यांमध्ये त्यांचे वर्णन होते, पण त्यांचे चित्र उपलब्ध नव्हते. बेळगावच्या काणे महाराजांना १९५६ मध्ये दृष्टांत झाला आणि त्यांनी एका चित्रकाराकडून निवृत्तीनाथांचे कृष्णधवल चित्र बनवून घेतले. ते त्र्यंबकेश्‍वर येथे समाधी परिसरात लावलेले आहे; मात्र त्याव्यतिरीक्त दुसरे चित्र नव्हते.

काही महिन्यांपूर्वी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानने अधिकृत तैलचित्र सावंतवाडीतील चित्रकार ठोंबरे यांच्याकडून बनवून घेण्याचा निर्णय घेतला. यात वारकरी संप्रदयातील विनीत सबनीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हे चित्र पूर्ण झाले असून, ते उद्या ट्रस्टतर्फे सबनीस स्वीकारणार आहेत. या चित्राचा प्रवास सबनीस यांनी ‘सकाळ’कडे मांडला. 

ते म्हणाले, ‘‘गहिनीनाथ यांनी निवृत्तीनाथाला दीक्षा दिली. गहिनीनाथ हे नाथ संप्रदायातील असले तरी त्यांनी निवृत्तीनाथांना कृष्णभक्‍तीकडे वळवले. येथूनच वारकरी संप्रदायाच्या परंपरेची सुरवात झाली. यामुळे वारकरी निवृत्तीनाथांना आद्यगुरू मानतात; पण त्यांचे मान्यताप्राप्त चित्र उपलब्ध नव्हते. समाधी संस्थानने हे चित्र बनवण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्री. ठोंबरे यांना समाधिस्थळी बोलवून चित्रपूर्तीचा संकल्प केला; मात्र संदर्भासाठी दुसरे चित्र उपलब्ध नव्हते. त्र्यंबकेश्‍वरला समाधिस्थळाचे विश्‍वस्त, पुजारी यांनी श्री. ठोंबरे यांना संत नामदेवांच्या ओव्यांमधील निवृत्तीनाथांचे वर्णन सांगितले. केवळ त्याला प्रमाण मानून हे चित्र साकारले आहे. याला संस्थाननेही मान्यता दिली आहे. 

निवृत्तीनाथ हे नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष आणि तुळशीची माळ अशी दोन्ही संप्रदायाची प्रतीके चित्रात दाखवली आहेत. कपाळावर भस्माचे पट्टे आणि वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेला नाम आहे. चित्राच्या मागे विठ्ठलाची तेजस्वी मूर्ती आणि ब्रह्मगिरी पर्वत दाखवला आहे. चित्र पाहिल्यानंतर यापेक्षा वेगळे निवृत्तीनाथ असणार नाहीत, याची खात्री पटते. हे चित्र समाधिस्थळी लावले जाईल. त्याच्या प्रतिमा वारीच्या पालखी ज्या ज्या मंदिरात जाते तेथे पाठवल्या जातील. भक्‍तांनाही त्याच्या प्रति उपलब्ध केल्या जातील.’’

श्री. ठोंबरे म्हणाले, ‘‘याआधी बरीच चित्रे साकारली; पण या चित्राचा अनुभव आत्मिक समाधान मिळवून गेला. पूर्णतः कल्पनेवर आधारित असे हे पहिलेच चित्र मी साकारले. हे चित्र रेखाटताना मला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते.’’

कोण आहेत आनंद ठोंबरे?
श्री. ठोंबरे यांनी आतापर्यंत अनेक प्रसिद्ध चित्रे साकारली आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांची ही कला जगाच्या नजरेत आली. त्यांनी कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाच्या ठिकाणचे प्रसिद्ध चित्र याबरोबरच श्री. ठाकरे, मीनाताई ठाकरे, धीरुभाई अंबानी आदींची साकारलेली चित्रे लोकप्रिय ठरली. कोणत्याही कला महाविद्यालयात शिक्षण न घेता त्यांनी ही कला आत्मसात केली. 

तैलचित्र आज त्र्यंबकेश्‍वरकडे रवाना
निवृत्तीनाथांचे चित्र आज (ता. २०) त्र्यंबकेश्‍वरकडे नेले जाणार आहे. याचे औपचारिक अनावरण ३१ जानेवारीला संत निवृत्तीनाथ यात्रेच्या निमित्ताने होईल. यानंतर ९ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्याचे नियोजन असल्याचे श्री. सबनीस यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com