Photo : रत्नागिरी, सिंधुदुर्गात रेड अलर्ट ; वादळ केळशीच्या दिशेने 

राजेश कळंबट्टे
Thursday, 15 October 2020

राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीला पूर

रत्नागिरी : मुसळधार पावसाचा धडाका काल पासून सुरूच आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ हळूहळू अरबी समुद्राच्या दिशेने सरकत आहे. दापोली केळशी किनाऱ्यावरून ते पुढे जाण्याची शक्यता असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीला पूर आला असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.

बुधवारी दिवसभर संततधार पाऊस सुरूच होता. गुरुवारी रात्री त्यात भर पडली. वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरूच असून वाऱ्याचा वेगळा ताशी 40 किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पावसामुळे भात शेतीचं पूर्णतः नुकसान झालं असून ओखी वादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा यंदा उद्भवली आहे.  हजारो हेक्टर भात पावसात भिजले असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसामुळं लांजा कुवे येथे वाहाळाला पूर आला आहे.  पुराचे पाणी जवळच्या शेतीमध्ये शिरले आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाचा जोर वाढत आहे. 

समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारीसाठी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.  काही परराज्यातील मच्छिमारी नौका सुरक्षेसाठी लावंगण ,  जयगड येथे दखल झाल्या आहेत.  भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नियंत्रण कक्ष यांचे कडून प्राप्त माहितीनुसार 17 ऑक्टोबर 2020 यां कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विशेषतः किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. 

वादळाने दिशा बदलली 

चक्रीवादळ मुंबईकडे जाईल असा अंदाज होता.  मात्र त्याने दिशा आधीच बदलली असून ते मुंबई कडे न जाता केळशी बंदरातून अरबी समुद्रात प्रवेश करेल.  त्याच्या संभाव्य मार्गात येणाऱ्या सर्व भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. 

विजेच्या कडकडाटासह वादळी वारा वाहणार आहेत. 
 नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ  नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात सरासरी पाऊस

 मागील 24 तासात जिल्ह्यात सरासरी 41.58 मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड 9.20,  दापोली 18.40,  खेड 88.40,  गुहागर 46.10,  चिपळूण 29.20,  संगमेश्वर 55.80, रत्नागिरी 56.30, लांजा 48, राजापूर 22.80 मिमी नोंद झाली.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Red Alert at Ratnagiri Sindhudurg Storm towards Kelshi