त्यासाठी आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित माणसांची दुसरी फळी आवश्यक ; देवेंद्र फडणवीस

प्रशांत हिंदळेकर | Monday, 10 August 2020

श्रीपाद नाईक यांच्याकडे इमर्जन्सी मेडिकल वॉरियर बाबतचा प्रकल्प सादर करण्यात आला.

मालवण (सिंधुदुर्ग)  : कोरोना रोगाच्या तसेच भविष्यातील जैविक युद्ध नियंत्रणासाठी, मेडिकल वॉरियर (आपत्कालीन वैद्यकिय योद्धा) संकल्पनेची गरज असून कोरोना महामारीसारख्या काळात रोगाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित माणसांची दुसरी फळी आवश्यक असल्याचे मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.

येथील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर तर्फे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे इमर्जन्सी मेडिकल वॉरियर बाबतचा प्रकल्प सादर करण्यात आला. हा प्रकल्प सादर केल्यानंतर ही संकल्पना महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या आरोग्य धोरणाचा भाग बनविण्याच्या दृष्टिकोनातून ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विवेक रेडकर यांनी मालवण दौऱ्यावर आलेल्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत याकडे लक्ष वेधले. यावेळी झालेल्या चर्चेत अशाप्रकारच्या महामारीच्या काळात रोगावर नियंत्रण मिळवायचे असेल तर इमर्जन्सी मेडिकल वॉरियरची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

हेही वाचा- शिवसेनेवर टीका करताना नारायण राणे म्हणाले, -

केंद्र आणि राज्य शासनाकडे या संकल्पनेचा पाठपुरावा करण्याची विनंती डॉ. रेडकर यांनी केली. त्याला श्री. फडणवीस उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी माजी मुख्यमंत्री खास.नारायण राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आम.रमेशदादा पाटील, आम. भाई गिरकर, आम. नीतेश राणे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी या संकल्पनेबाबत विस्तृत चर्चा केली. यावेळी संस्थेचे विश्वस्त रविकिरण तोरसकर उपस्थित होते. अतुल काळसेकर यांनी ही चर्चा घडवुन आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.

संपादन - अर्चना बनगे