सिंधुदुर्गात आपत्ती नियोजनाचा प्रशासनास विसर

नंदकुमार आयरे
शुक्रवार, 5 मे 2017

पावसाळा तोंडावर तरी हालचाल नाही - उपाययोजनांच्या नियोजन बैठकीची प्रतीक्षा

सिंधुदुर्गनगरी - पावसाळा महिन्यावर येऊन ठेपला तरी जिल्हा प्रशासनाला अद्यापही पावसाळापूर्व उपाययोजना नियोजन बैठकीला मुहूर्त सापडलेला नाही. जिल्ह्यातील खड्डेमय रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडे, लोंबकळणाऱ्या विद्युतवाहिन्या आणि नदी- नाल्यांमध्ये साचलेला गाळ याबाबतच्या उपाययोजना केव्हा होणार, हा प्रश्‍नच आहे.

पावसाळा तोंडावर तरी हालचाल नाही - उपाययोजनांच्या नियोजन बैठकीची प्रतीक्षा

सिंधुदुर्गनगरी - पावसाळा महिन्यावर येऊन ठेपला तरी जिल्हा प्रशासनाला अद्यापही पावसाळापूर्व उपाययोजना नियोजन बैठकीला मुहूर्त सापडलेला नाही. जिल्ह्यातील खड्डेमय रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडे, लोंबकळणाऱ्या विद्युतवाहिन्या आणि नदी- नाल्यांमध्ये साचलेला गाळ याबाबतच्या उपाययोजना केव्हा होणार, हा प्रश्‍नच आहे.

पावसाळा सुरू होण्यास केवळ महिन्याचा अवधी राहिला आहे. बुधवारी जिल्ह्यातील काही तालुक्‍यांत वळवाच्या तुरळक सरी बरसल्या. तरीही अद्याप जिल्हा प्रशासनाला माॅन्सूनपूर्व नियोजन बैठकीला मुहूर्त सापडलेला नाही. जिल्ह्यात दरवर्षी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची सुरवात होते. पहिल्याच पावसात पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा इतिहास आहे. सर्वाधिक पाऊस पडणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गाची ओळख आहे, असे असताना जिल्हा प्रशासनाकडून माॅन्सूनपूर्व नियोजन होण्याची आवश्‍यकता आहे. जिल्ह्यातील खराब खड्डेमय झालेले रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली धोकादायक झाडे, झाडीझुडपातून लोंबकळणाऱ्या विद्युतवाहिन्या, गंजलेले पोल, नदी-नाल्यांमध्ये साठलेला गाळ याबाबत बैठक होऊन पावसाळ्यापूर्वी केवळ एक महिना शिल्लक असतानाही जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही कोणत्याही उपाययोजनेबाबत हालचाली सुरु झालेल्या नाहीत.

सिंधुदुर्गात खेडोपाडी जाणारे रस्ते खड्डेमय झालेले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढलेली आहे. अशा रस्त्याची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती होणे आवश्‍यक आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी तोडण्याची आवश्‍यकता असून पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत होण्याच्या दृष्टीने आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील नदी-नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठलेला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून लोकसहभागातून जिल्ह्यात कच्चे व वनराई बंधारे बांधले आहेत. एकाच नदी-नाल्यावर अनेक ठिकाणी माती भरलेल्या पिशव्या घालून बंधारे बांधण्याची मोहीम राबविली. असे बंधारे आता कोरडे झाले आहेत. या बंधाऱ्यामुळे नदीनाल्यातील पाण्याचा मार्ग (प्रवाह) अडला जातो. लगतच्या शेती बागायतीचे यामुळे नुकसान होते. उन्हाळ्यात पाणी अडविण्यासाठी बांधलेले हे कच्चे बंधारे पावसाळ्यात पावसाचे पाणी अडवून शेती नुकसानीस कारणीभूत ठरणारतात. असे बंधारे पावसाळ्यापूर्वी काढून नदी-नाल्यांचा प्रवाह मोकळा करण्याची आवश्‍यकता आहे. जिल्ह्यात गावागावात होणाऱ्या विद्युत पुरवठ्यासाठी अनेक वर्षापूर्वी टाकलेले लोखंडी खांब (पोल) काही ठिकाणी गंजले आहेत, धोकादायक बनले आहेत.

विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत. विद्युत वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या झेपावल्या आहेत. पावसाळ्यात यापासून जीवित हानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होण्याची शक्‍यता आहे. यासाठी पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील गंजलेले धोकादायक

विद्युत खांबावरच्‍या फांद्याही तशाच...
विद्युत लोखंडी खांब (पोल) बदलण्याची तसेच वाहिन्या सुस्थितीत करण्याची गरज आहे. विद्युत वाहिन्यांवर आलेल्या व स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी तोडून विद्युत पुरवठा अखंडित राहण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे; मात्र जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही याबाबत हालचाली झालेल्या दिसून येत नाहीत. आपत्ती ओढवल्यानंतर उपाययोजना करण्यासाठी धावपळ करण्यापेक्षा आपत्ती येऊ नये, अनर्थ घडू नये यासाठी प्रशासनाकडून दखल घेत उपाययोजना आखण्याची गरज आहे.

कच्चे बंधारे ठरणार त्रासदायक
जिल्हा परिषद प्रशासनातर्फे पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात कच्चे व वनराई बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात आली. सुमारे साडेतीन हजार एवढे बंधारे बांधण्यात आले; मात्र हेच बंधारे पावसाळ्यात त्रासदायक ठरणार आहेत. नदीनाल्याच्या प्रवाहात बांधलेले बंधारे आता कोरडे पडले आहेत; मात्र या बंधाऱ्यांसाठी वापरलेल्या माती भरलेल्या पिशव्या पावसाळ्यापूर्वी नदीच्या पात्रातून बाजूला करणे आवश्‍यक असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात नदी-नाल्याचे पाणी अडले जाऊन शेतीचे नुकसान होण्यास कारणीभूत ठरणार आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वी नदी-नाल्यातील बंधाऱ्यांच्या पिशव्या हटविण्याची मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.

Web Title: Regarding the administration of disaster planning in Sindhudurg