esakal | दरडग्रस्तांचे पुनर्वसन गृहनिर्माण प्रकल्पात
sakal

बोलून बातमी शोधा

darad

दरडग्रस्तांचे पुनर्वसन गृहनिर्माण प्रकल्पात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : अतिवृष्टीमुळे जमिनीला भेगा, डोंगर खचणे, दरड कोसळण्यामुळे स्थलांतर आणि पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झालेल्या कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. धरणग्रस्त गावांची भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी करून सर्वेक्षण केले आहे. त्यांच्या अहवालानंतरच येथील कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्वसन न करता एकाच गृहनिर्माण प्रकल्पात त्यांना सामावून घ्यावे. यासाठी आवश्यक असलेल्या जागेचा शोध घ्यावा, अशा सूचना खासदार विनायक राऊत यांनी आढावा बैठकीत दिल्या.

जुलैमध्ये चिपळुणात झालेल्या अतिवृष्टीत ग्रामीण भागात मोठा फटका बसला. तिवरे गावात जमिनीला प्रचंड भेगा पडल्या. तसेच डोंगर खचण्याचे प्रकार घडले. सुरक्षिततेचा पर्याय म्हणून येथील अनेक कुटुंबांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले. भूगर्भतज्ज्ञांच्या पथकाकडून येथील जमिनीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्या ठिकाणी वास्तव्य करणे योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न उभा राहिला. तालुक्यातील अन्य गावांतही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून तेथील कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या पुनर्वसन प्रश्नांची दखल घेत, खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी (ता. ४) चिपळूण विश्रामगृहात बैठक घेतली. बैठकीला प्रांताधिकारी, तहसीलदार, सर्व संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी, आमदार शेखर निकम, भास्कर जाधव उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होऊन विस्थापित झालेल्या सर्व कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर चर्चा करून आढावा घेण्यात आला.

जागेचा शोध घेण्याच्या सूचना

गृहप्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने तालुक्यात जागा उपलब्ध आहे का? असे गृहप्रकल्प आपण उभे करू शकतो का, याबाबत आढावा घेण्याच्या सूचना प्राधिकरणाला देण्यात आल्या. संपूर्ण अहवाल तयार केल्यानंतर पुन्हा एकदा याबाबत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

वेगवेगळ्या ठिकाणी घरे बांधणे शक्य नाही

आमदार जाधव यांनी मुंबईतील बैठकीचा दाखला दिला. त्या बैठकीत पुनर्वसनाबाबत चर्चा करताना प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी घरे बांधणे शक्य होणार नाही, तसेच त्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. त्यापेक्षा एकाच ठिकाणी गृहप्रकल्प उभे करून त्यामध्ये सर्वांचे पुनर्वसन करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

एक दृष्टिक्षेप

  1. चिपळुणातील अतिवृष्टीने ग्रामीण भागाला मोठा फटका

  2. तिवरे गावात जमिनीला पडल्या प्रचंड भेगा

  3. अनेक कुटुंबांचे केले तात्पुरते स्थलांतर

  4. भूगर्भतज्ज्ञांच्या पथकाकडून जमिनीची तपासणी

  5. वास्तव्य करणे योग्य नसल्याचा अहवाल

  6. कायमस्वरूपी पुनर्वसनाचा उभा राहिला प्रश्न

loading image
go to top